पुढील सुनावणी आता जानेवारी महिन्यात
प्रतिनिधी /पणजी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि काँग्रेस पक्षातून मिळून 12 आमदार भारतीय जनता पक्षात विलीन झाले. त्यांना सभापतीनी पात्र ठरवले, या पात्रतेला गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी सदर आव्हान याचिकेवर युक्तिवाद होण्यापूर्वीच सुनावणी पुढे जात असून आता पुढील सुनावणी जानेवारी 2022 मध्ये होणार आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती साधना एस. जाधव आणि न्या. रेवती मोहिते देरे या द्विसदस्यीय न्यायपीठासमोर सुनावणीस आली. यापूर्वी सदर याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते देरे व न्या. एम. एस. जवळकर या न्यायपीठाकडे आली होती. प्रत्येकवेळी एकतर वकील बदलला जातो व वेळ मागितली जाते किंवा न्यायपीठ बदललेले असते. न्या. महेश सोनक यांनी तर सदर याचिका आपल्यासमोर सुनावणीस ठेवली जाऊ नये, असा शेरा मारला आहे.
प्रतिवाद्यांची बाजू 24 डिसेंबरपर्यंत संपणार का
सदर याचिका ऍडमिशन बोर्डच्या शेवटी सुनावणीस ठेवावी, असे न्यापीठाने यापूर्वी सुचवल्याने सदर याचिका न्यायपीठाच्या फलकावर 41 व 42 क्रमांकावर होती. याचिकेवरील सुनावणी अंतिम सुनावणी असल्याने उत्सुकतेपोटी अनेक राजकीय कार्यकर्ते न्यायालयीन परिसरात जमले होते. सदर याचिका दुपारी 2.30 वा. सुनावणीस येणार असे सांगून वकिलांनी त्यांना पिटाळले. दुपारी 4 वा. सदर याचिका सुनावणीस आली तेव्हा माजी ऍडव्होकेट जनरल कार्लुस आल्वारो नरोन्ह फेरेरा यांनी म. गो. पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यास प्रारंभ केला. याचिकेवरील वादी प्रतिवाद्यांची बाजू दि. 24 डिसेंबरपर्यंत संपणार का हा नेहमीचाच प्रश्न परत उपस्थित झाला.
दि. 5 जानेवारी 2022 पासून नवे द्विसदस्यीय न्यायपीठ भरणार आहे. त्यामुळे या न्यायपीठाने बाजू ऐकून घेऊन फायदा नसल्याचे न्यायपीठाच्या नजरेस आणून दिले. शेवटी सुनावणी पुढे ढकलल्याशिवाय पर्यायच नव्हता. न्यायालयाच्या परिसरातून बाहेर निघताना मात्र वकील आपापसात बोलताना या याचिकेच्या सुनावणीला योग्य मुहूर्तच नसल्याचे बोलत होते.