तृणमूल काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश : 17 पैकी 15 आमदारांनी सोडली काँग्रेस.आता राहिले केवळ दोन आमदार
प्रतिनिधी /पणजी
कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला असून तो काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक आणि क्लेशदायक ठरला आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्यांची कुडतरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षाची पुरती नाचक्की झाली आहे. काँग्रेसकडे आता केवळ दोनच आमदार शिल्लक राहिले असून ते तरी पक्षात राहतात की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेले कित्येक वर्षे पक्षात अस्वस्थ असलेले आलेक्स रजिनाल्ड यांनी या अगोदर आप तसेच भाजपचेही दरवाजे ठोठावले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील आमदारकीचा राजीनामा देणारे ते यंदाच्या निवडणुकीतील पहिले आमदार ठरले आहेत. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेले लॉरेन्स हे आतापर्यंत चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
लॉरेन्स यांनी काल सोमवारी अचानकपणे पर्वरी येथे जाऊन सभापती कार्यालयात दाखल होऊन तेथे आमदारकीचे राजीनामा पत्र सादर केले. त्यांचा हा निर्णय म्हणजे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे.
काँग्रेस 17 वरुन 2 वर आला
मागील निवडणुकीत 2017 मध्ये 17 उमेदवार (आमदार) विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाकडे आता केवळ 2 आमदार उरले आहेत. आतापर्यंत एकूण 6 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या 34 झाली आहे. गोव्यात विविध पक्षातील आमदारांचे राजीनामा सत्रच चालू असून येणाऱया काळात आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
लॉरेन्स यांच्या राजीनाम्याच्या धक्कादायक निर्णयावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते जसे पक्षात अस्थिर होते आणि आता जिथे जाणार तिथे तरी स्थीर रहातील काय? असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला आहे.
रेजिनाल्डना लोकच धडा शिकवणार
अशा स्वार्थी आपमतलबी विश्वासघात करणाऱया आमदारांना आता लोकच धडा शिकवतील असे गुंडू राव यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने अनेक धक्के, सुनामी पचवल्या असून 2022 मध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होणार असून त्यांचे नेतृत्व आपण करणार असल्याचे कामत यांनी नमूद केले आहे.
कुडतरी मतदारसंघात काँग्रेस नवीन चेहरा देणार आहे. रेजिनाल्ड यांनी पक्षांतर्गत अनेक गुन्हे केले होते आणि पक्षाने त्यांना ते माफही केले असतानाही त्यांनी शेवटी पक्षाचा विश्वासघात केला असल्याचे चोडणकर म्हणाले.
प.बंगालला रवाना, आज करणार पक्षात प्रवेश
आलेक्स रेजिनाल्ड हे आपला राजीनामा सादर केल्यानंतर थेट कोलकाता येथे रवाना झाले. तिथे तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार शंतनू सेन व आमदार तपस चटर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. रेजिनाल्ड हे आज प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार असून तिथे ते त्यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.