सखल भागात चालले होते भराव टाकण्याचे काम : मुंगूल, माडेल व नजीकच्या परिसरांतील लोकांचा आक्षेप
प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुंगूल, माडेल व आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांसह घाऊक मासळी बाजाराजवळील सखल भागात सुरू असलेले भराव टाकण्याचे काम शुक्रवारी थांबवले. पश्चिमी बगलरस्त्याच्या कामाचा हा भाग आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी सखल भागात भातशेतीची जमीन भरून पश्चिमी बगलरस्ता बांधण्यास जोरदार विरोध केला होता. यामुळे मुंगूल आणि माडेलमध्ये मोठय़ा प्रमाणात पूर येईल, असे त्यांनी म्हटले होते.
या पूरप्रवण भागांतील पश्चिमी बगलरस्त्याच्या कामाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीने पश्चिमी बगलरस्त्याच्या बांधकामाबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांचा अभ्यास करण्याची सूचना केली होती. सरदेसाई यांनी शुक्रवारी मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी हे काम अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी असल्याची आमदारांची खात्री पटल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
सरदेसाई यांनी सरकारच्या हेतूवर शंका व्यक्त केली आहे. कारण 15 मीटर रस्ता ‘ऍक्सेस रोड’ म्हणून आवश्यक नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच सरकारने यापूर्वीही आपले शब्द पाळले नसल्याची उदाहरणे आहेत. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि चेन्नईसारख्या पूरस्थितीला आळा घालण्याच्या उद्देशाने स्थानिकांनी मागणी केलेल्या विकासासाठी निधी उपलब्ध न करता शेकडो कोटी रुपये लोकांना नको असलेल्या विकासावर खर्च केले जात आहेत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. भाजप सरकारच्या दुहेरी इंजिनाच्या विकास मॉडेलवरही त्यांनी टीका केली.