डिचोली/प्रतिनिधी
आमोणा-सांखळी येथे काल शनिवार 24 एप्रिल रोजी रात्री दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनिअर ठार झाला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत 108 रुग्णवाहिकेतून बांबोळीत नेले असता मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी चारचाकी चालकाविरोधात गुन्हा नेंदविण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार रात्री 7.30 वा. च्या सुमारास सदर अपघात आमोणा येथे घडला. मयत मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय प्रकाश परब (33) हे युनिकॉर्न दुचाकीने (एम एच 04 डीएल 0212) आमोणा न्हावेलीच्या दिशेने येत असताना विरुद्ध दिशेने माशेलच्या बाजूला जाणाऱया बॉलेनो कार (जीए 04 ई 0192) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीचालक अजय परब गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून बांबोळी येथे गोमेकॉत नेले असता मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद यांनी पंचनामा केला. बॉलेनो चालक मायणा न्हावेली सांखळी येथील केदार रामचंद्र नाईक (28) याला ताब्यात घेतले आहे, तर अपघाताचा गुन्हा नोंद केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.