मुंबई/प्रतिनिधी
राज ठाकरेंनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण वाढल्याचाआरोप केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असं म्हंटलं होतं. पुन्हा गुरुवारी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी “जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी, असं ते म्हणाले. दरम्यान राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरींच्या या वक्तव्यांनंतर मनसेचे गदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिलीय.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरींनी ‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. मात्र, हे प्रत्युत्तर मनसेच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिलीय. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय. त्यामुळे आता हा वाद पेटणार असं दिसतंय.
“मिटकरी यांना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटर बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू. तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करुन जातात, आता जास्त काळ्या काचा करुन जा. नाहीतर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाहीतर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही,” अशी धमकी मनसैनिक खांडेकर यांनी दिली.