प्रतिनिधी/ बेळगाव
वधू-वर दोघेही परदेशात, दोघांचेही आई-वडील भारतात, मात्र सर्वांच्या संमत्तीने आणि सोयीसाठी परदेशात एका बेटावर विवाह सोहळा भारतीय पद्धतीने पार पडला आणि झूमवरून आजोबा आजींसह सर्व नातलगांनी या विवाहाचे साक्षी होत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
हा विवाह आहे दीप कर्पे व मोहिनी बोरसे यांचा. दीप हा बेळगावचे व्यापारी काका कलघटगी यांचा नातू तर संगीता व गिरीश यांचा मुलगा तर मोहिनी ही प्रतिभा व अनिल बोरसे यांची कन्या. ही दोन्ही कुटुंबे अनुक्रमे गोरेगाव व अंधेरी येथे वास्तव्यास आहेत. दीप आणि मोहिनी यांची मैत्री होती. त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही विवाह करण्याचे ठरविले. दीप आयआयटी पदवीधर असून, ऍपलमध्ये कॅलिफोर्निंया (अमेरिका) येथे नोकरी करतो तर मोहिनी सीऍटल येथे मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करते. कोरोनामुळे सध्या त्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
दोन्हीकडच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी विवाह करण्याचे ठरविले. भारतात येऊन विवाह होणारही होता. तथापि कोरोनाचे संकट उद्भवले आणि भारतात येणे अशक्मय झाले. विवाह लांबणीवर टाकणे योग्य नाही असा विचार सर्वांनीच केला. आणि 20 ऑक्टोबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. वास्तविक दोघांनाही भारतीय वैदिक पद्धतीने विवाह करावयाचा होता. परदेशात नोंदणी पद्धतीनेच विवाह करावा लागणार असे वाटत असतानाच दीपच्या आत्यांनी शैला श्रॉफ यांचे नाव सुचविले.
शैला या बेळगावच्या असून, वाय. के. प्रभू यांच्या कन्या असून माधुरी शानभाग यांच्या भगिनी होत. त्या फ्लोरिडामध्ये राहतात. विशेष म्हणजे त्यांनी अमेरिकेमध्ये भारतीय पद्धतीने 50 हून अधिक विवाह लावून दिले आहेत. दीप व मोहिनी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व दिलेल्या साहित्याची यादी घेऊन त्यानुरुप खरेदी केली. अर्थात वधूची साडी व वराचा पोषाख पालकांनी भारतामधून पाठवून दिला. दोघांनीही वॉट्सऍपवर फोटो पाहून त्याची पसंती कळविली होती.
विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे दीपने परदेशात मंगळसूत्रही खरेदी केले. दोघांच्याही मित्र परिवाराने हळदीची सुद्धा तयारी केली. वधू-वरांना हळद लागली, फ्लोरिडामधून शैला श्रॉफ यांनी विवाहाचे पौरोहित्य केले. गणेश पूजन, होम, सप्तपदी, कन्यादान असे सर्व विधी दोघांनीही मनापासून केले. मुलाच्या मित्राने व त्याच्या पत्नीने मोहिनीचे कन्यादान केले. तर आणखीन एका मित्राने मोहिनीचा भाऊ म्हणून कान पिळीचा विधी सुद्धा केला.
झूमवर बेळगावमधून कलघटगी कुटुंबीय तसेच मीना खानोलकर यांनी अंधेरी व गोरेगाव येथून दोघांच्याही पालकांनी व नातलगांनी, कोल्हापूरहून आत्यांनी इंग्लंडमधून काकानी, लखनौमधून मुलीच्या मावशी व अन्य नातेवाईकांनी हा विवाह सोहळा पाहिला. आणि प्रतिकात्मकरित्या फुलांच्या पाकळय़ांचे अक्षतारोपण केले.
सकारात्मकतेचे उदाहरण
कोरोनाने सध्या एकप्रकारची नकारात्मकता आणली आहे. काहीही करायचे म्हटले तर प्रथम कोरोनाचे प्रश्नचिन्ह उभे राहते. भारतात येता येत नाही, विवाह सोहळे करता येत नाहीत, हे शक्मय नाही, ते जमणार नाही अशी सर्व नकारात्मकता असताना मोहिनी व दीप यांचा विवाह हा सकारात्मकतेचे उदाहरण ठरला आहे.