तालिबानची लुटलेली अमेरिकन शस्त्रे काश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांच्या हाती
श्रीनगर / वृत्तसंस्था
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय सीमेवर ‘नापाक’ कारस्थान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तालिबानच्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी शक्तींना भडकवून मोठा कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या षड्यंत्रासाठी आयएसआय अफगाणिस्तानात लुटलेली अमेरिकन शस्त्रे काश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांना पुरवत असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) डीजी पंकज कुमार सिंग यांनी सांगितले.
या वर्षात आतापर्यंत भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानसह किमान 67 ड्रोन निदर्शनास आले. सध्या आपल्या देशात येणाऱया ड्रोनची संख्या खूपच कमी आहे. हे सर्व ड्रोन चीनमध्ये बनवलेले आहेत. या ड्रोनमध्ये लहान पेलोड वाहून नेण्याची क्षमता असल्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रतस्करी केली जात आहे. बीएसएफने गेल्या काही दिवसात दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. या कारवायांमध्ये शस्त्रेही पकडण्यात आली आहेत. तथापि, सदर परिसरात ड्रोनच्या हालचाली रोखण्याचा कोणताही मार्ग नसल्याचेही सिंग यांनी सांगितले.
अत्याधुनिक अँटीड्रोन यंत्रणा हवी
बीएसएफने सीमेवर विशिष्ट प्रकारच्या ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केल्या आहेत. मात्र सीमेपलीकडून होणाऱया कारवाया नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. यावरही काम सुरू आहे. लवकरच आमच्याकडे अशा प्रणाली असतील. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या संपूर्ण 2,300 किमी सीमेवर अँटी-ड्रोन यंत्रणा तैनात करण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु ते शक्मय होईल, असा आशावादही बीएसएफच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला.
घुसखोरीबाबत बीएसएफ अलर्ट
सिंग यांनी खोऱयातील दहशतवादी घुसखोरीबाबतही भाष्य केले. दहशतवादी सीमेच्या कुंपणाच्या 100 मीटर खाली बांधलेल्या बोगद्यातून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. हा बोगदा 30 फूट खोल असून त्याची रुंदी आणि उंची 3 ते 4 फूट असते. दहशतवाद्यांच्या या छुप्या मार्गावरही बीएसएफची नजर असून अशाप्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी आपले जवान तांत्रिकदृष्टय़ा काम करत आहोत. भुयारी मार्गाने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी नव्या पद्धती विकसित केल्या जात आहेत. मात्र, त्याबाबत आताच अधिक माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लुटलेल्या शस्त्रांचा भारताविरोधात वापर
ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर सैनिकांनी अमेरिकन शस्त्रे लुटली. पाकिस्तानच्या सीमेवर अनेक चिलखती वाहने आणि लष्करी उपकरणेही दिसली. त्यावेळी ही शस्त्रे पाकिस्तानला विकली जाऊ शकतात आणि शेजारी देश त्यांचा भारताविरुद्ध वापर करू शकतात, अशी भीती संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली होती.