घरात पाळले 400 विषारी कोळी
ब्रिटनच्या एका महिलेने स्वतःच्या घरात 400 कोळय़ांना स्थान दिले असून यातील अनेक अत्यंत विषारी आणि धोकादायक आहेत. यामुळे आता बेथानी स्टेपल्सच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या घरी जाणेच बंद केले आहे. बहुतांश लोक माझ्या घरात येत नाहीत. कोळय़ांनी आता पूर्ण एका खोलीवर कब्जा केला असलयाचे 28 वर्षीय बेथानीचे सांगणे आहे.
बेथानीने स्वतःच्या रिकाम्या खोलीत 150 प्रौढ कोळी आणि त्यांच्या 250 पिल्लांना स्थान दिले असून यात अनेक विषारी प्रजाती म्हणजेच थायलंडमधील टारेंटयुला देखील सामील आहे.
बेथानीने कोळय़ांसंबंधीच्या स्वतःच्या भीतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पाळण्यास सुरुवात केली होती. या छंदाने आता तिची भीती पूर्णपणे संपली आहे. हे पोकेमॉनप्रमाणेच आहे. मी त्या सर्वांना पकडू इच्छिते. कोळय़ांचे अनेक प्रकार असल्याने हा छंद एखाद्या व्यसनाप्रमाणे असल्याचे तिचे सांगणे आहे. बेथानीने 2020 मध्ये पहिल्यांदा कोळय़ांना पकडण्यास सुरुवात केली होती आणि मागील वर्षी तिने ब्रीडिंग सुरू केले आहे.
छंदात रुपातंरित झाली भीती
मला घरात किमान एक तरी पाळीव प्राणी असावा असे वाटत होते. परंतु कोळी याची जागा घेईल असा विचारही केला नव्हता, कारण मी त्यांना खूप घाबरत होते असे सांगणाऱया बेथानीची भीती आता छंदात बदलली आहे. टारेंटयुलाच्या वेगवेगळय़ा 1 लाख प्रजाती असतात. काहींचे विष इतरांच्या तुलनेत अधिक धोकादायक असते असे तिने म्हटले आहे.
जीवघेणे नाही
कुठल्याही टारेंटयुलाचे विषय माणसांचे जीव घेण्यास सक्षम नसल्याचे तिने म्हटले आहे. ती कोळय़ांना आठवडय़ातून एकदा किडे अणि झुरळं खायला देते. बेथानी आता विंचू, पाल आणि श्वान देखील पाळत आहे. या प्राण्यांना अन्न देण्यास मला काही तास लागतात असे तिचे म्हणणे आहे.