सेन्सेक्स 134 अंकांनी मजबूत- टेक महिंद्रा नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी आयटी क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीने आणि कंपन्यांच्या तिमाही अहवालाच्या सादर होणाऱया आकडेवारीच्या प्रभावामुळे बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे दिवसअखेर सेन्सेक्स 134 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,904.05 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41.60 अंकांनी वाढून निर्देशांक दिवसअखेर 15,853.95 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक 2.69 टक्क्यांनी वाढले आहेत. यासोबतच एचसीएल टेक, इन्फोसिस, लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा स्टील, आयटीसी आणि टीसीएसचे समभाग नफा कमाईत राहिले होते. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, डॉ.रेड्डीज लॅब तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
तिमाही अहवालाचा परिणाम
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.24 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये इन्फोसिसने बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही अहवालाचे आकडे सादर केले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा 22.7 टक्क्यांनी वाढल्याची माहिती दिली आहे. यासोबतच अन्य कंपन्यांचे तिमाही अहवाल लवकरच सादर होणार असल्याच्या संकेतामुळे बाजारात सकारात्मक स्थिती राहिल्याचे दिसून आले आहे.
जागतिक प्रमुख बाजारात आशियातील चीनचा शांघाय कम्पोझिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, हाँगकाँगचा हँगसेंग तसेच जपानचा निक्केई हे बाजार घसरणीत राहिले आहेत. यासह अन्य घडामोडींमध्ये जागतिक पातळीवरच्या बाजारात मात्र बुधवारी नकारात्मक कल राहिल्याचे दिसून आले.