केव्हा उघडणार झाकली मूठ?
@ 15 व्या आवृत्तीची यंदाची आयपीएल स्पर्धा अवघ्या 23 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना 9 संघांचे कर्णधार यापूर्वीच सुनिश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर प्रँचायझीने मात्र आपले पत्ते अद्याप गुलदस्त्यातच ठेवले असून यंदाच्या हंगामासाठी कर्णधार कोण असेल, हे जाहीर करणे शक्य तितके लांबणीवर टाकले आहे. हा महत्त्वाचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा नेमका उद्देश काय, कर्णधारपदासाठी कोण आघाडीवर आहेत आणि विराटचीच पुन्हा नेतृत्वासाठी मनधरणी केली जाणार का, याची ही एक संक्षिप्त झलक!
उपलब्ध पर्यायांमध्ये फॅफ डय़ू प्लेसिस आघाडीवर
आगामी हंगामात विराट कोहली कर्णधार नसेल, याची आरसीबी प्रँचायझीला मेगा ऑक्शनपूर्वी पूर्ण कल्पना होती आणि त्या दृष्टीने ते डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ अशा खेळाडूंपैकी एकाला कर्णधारपदाचा उमेदवार म्हणून करारबद्ध करतील, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात त्यांनी एकमेव स्टार खेळाडू निवडला तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा फॅफ डय़ू प्लेसिस!
आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये फॅफला 7 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून त्याच्याकडे या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. फॅफ डय़ू प्लेसिस मागील हंगामापर्यंत चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळला असून आयपीएल इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण खेळाडूंमध्ये त्याचा आवर्जून समावेश होतो. चेन्नईने 2021 आयपीएल जिंकले, त्यावेळी त्या विजयी मोहिमेत प्लेसिसने 16 सामन्यात 633 धावांचा झंझावात साकारला होता. आजवर एकही आयपीएल जेतेपद पटकावता न आलेल्या आरसीबीला हा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी फॅफकडून प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ते फॅफची कर्णधारपदी निवड करु शकतात.
फॅफ डय़ू प्लेसिसची उपलब्धता पाहूनच निर्णय जाहीर करणे, ही देखील अद्याप कर्णधार नियुक्त न करण्यामागील आरसीबीची रणनीती असू शकते.
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल शर्यतीत दुसऱया स्थानी!
मागील आयपीएल स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेल हा आरसीबीचा स्टार फलंदाज ठरला. त्याने हंगामात 42.75 ची सरासरी, 6 अर्धशतकांसह एकूण 513 धावांची आतषबाजी केली. बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व ग्लेन मॅक्सवेलकडे असते, ही त्याची जमेची बाजू आहे. याशिवाय, मॅक्सवेलचे आरसीबीच्या अंतिम एकादशमधील स्थान देखील सुनिश्चित असते, ही बाबही त्याच्या पथ्यावर पडणारी असेल. मात्र, दि. 6 एप्रिलपर्यंत तो आयपीएलमध्ये सहभागी नसेल आणि यामुळे त्याचा कितपत विचार होईल, हे कालांतरानेच स्पष्ट होणार आहे.
स्वदेशी कर्णधार म्हणून दिनेश कार्तिकचा पर्याय
जर आरसीबीला विदेशी खेळाडूऐवजी एखाद्या भारतीय खेळाडूलाच कर्णधारपदी नियुक्त करायचे असेल आणि विराट राजी होत नसेल तर अशा परिस्थितीत या प्रँचायझीकडे दिनेश कार्तिकचा पर्याय उपलब्ध असणार आहे. दिनेश कार्तिकने 2018 च्या आयपीएल हंगामात केकेआरचे नेतृत्व सांभाळले. पण, 2020 मध्ये आयपीएलच्या मध्यातच त्याची नेतृत्वावरुन उचलबांगडी देखील झाली होती.
प्रसंगी विराटचे मन वळवण्याचा पर्यायही उपलब्ध!
मागील वर्षी विराट कोहलीने आरसीबी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर या प्रँचायझीने नेतृत्वासाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली. नंतर त्यांनी विराट कोहलीला 15 कोटी रुपये मानधनासह संघात रिटेन केले. पण, मेगा ऑक्शनपूर्वी आणि त्यानंतरही त्यांनी कर्णधार कोण असेल, हे जाहीर करणे शिताफीने टाळले. कर्णधार कोण याची वाच्यता न करणे, हा त्यांचा गेमप्लॅन आहे की अगतिकता, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, विराट म्हणजेच आरसीबी हे आरसीबी चाहत्यांच्या मनातील समीकरण नजरेसमोर ठेवत त्यांनी विराटचे मन वळवण्याचा निर्णय घेतला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
काय असतील विराटकडे नेतृत्व सोपवण्यामागील फायदे-तोटे?
आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, कसोटी चॅम्पियनशिप असा भरगच्च हंगाम नजरेसमोर असताना विराट कोहली पूर्ण तंदुरुस्त व ताजातवाना असणे भारतीय संघाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असेल आणि या पार्श्वभूमीवर, विराटचे वर्कलोड मॅनेजमेंट हा प्राधान्यक्रम असणे आवश्यक आहे. साहजिकच, विराटकडे आयपीएलमधील किती जबाबदारी असेल, याकडे बीसीसीआयचेही लक्ष असणार आहे.
आयपीएल स्पर्धेतील 9 संघ व त्यांचे कर्णधार
चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) ः महेंद्रसिंग धोनी
दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ः रिषभ पंत
गुजरात टायटन्स (जीटी) ः हार्दिक पंडय़ा
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ः श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ः केएल राहुल
मुंबई इंडियन्स (एमआय) ः रोहित शर्मा
पंजाब किंग्स (पीबीकेएस) ः मयांक अगरवाल
राजस्थान रॉयल्स (आरआर) ः संजू सॅमसन
सनरायजर्स हैदराबाद (एसआरएच) ः केन विल्यम्सन
आरसीबी संघातील सध्याचे खेळाडू (कंसात कराराची रक्कम)
रिटेन खेळाडू ः विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी).
मेगा ऑक्शनमध्ये करारबद्ध खेळाडू ः फॅफ डय़ू प्लेसिस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75 कोटी), वणिंदू हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जोश हॅझलवूड (7.75 कोटी), शाहबाज अहमद (2.4 कोटी), अनुज रावत (3.4 कोटी), आकाश दीप (20 लाख), महिपाल लोमरोर (95 लाख), फिन ऍलन (80 लाख), शेरफेन रुदरफोर्ड (1 कोटी), जेसॉन बेहरेनडॉर्फ (75 लाख), सुयश प्रभुदेसाई (30 लाख), सी. मिलिंद (25 लाख), अनिश्वर गौतम (20 लाख), कर्ण शर्मा (50 लाख), सिद्धार्थ कौल (75 लाख), लुव्हनिथ सिसोदिया (20 लाख), डेव्हिड विली (2 कोटी).
-विवेक कुलकर्णी