वार्ताहर/ राजापूर
शहरातील एसटी डेपोलगतच्या दर्ग्यासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला कंटेनरने मागून धडक दिल्याने अपघात घडला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर बसस्थानकालगत असलेल्या दर्ग्याच्या बाजूला आयशर टेम्पो उभा होता. यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱया कंटेनरने आयशरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला. शिवाय दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यातच होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर कंटेनर हटवण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान लॉकडाऊनमुळे महामार्गावरील वर्दळ कमी असल्याने मालवाहू ट्रक, कंटेनर दिवसा तसेच रात्रीच्या वेळी भरधाव वेगात गाडय़ा चालवत असतात. काहीजण तर मद्यपान करून गाडय़ा चालवत असतात. अशा बेदरकार वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे महामार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अशा वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.