प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती कोरोना नियंत्रण पथकामध्ये करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेचे कामकाज सुरू झाल्याने आता कार्यालयातदेखील हजेरी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे काही कर्मचाऱयांच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या व्यवस्थापकपदी बी. एम. पिसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी महसूल विभागात फारुक यड्रावी यांच्याकडे व्यवस्थापकपदाची जबाबदारी होती. मात्र, त्यांची बदली सामान्य प्रशासन विभागात करण्यात आली होती. पिसाळे यांच्याकडे महसूल विभागात व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र पुन्हा जैसे थे ठेवण्यात आले असून बी. एम. पिसाळे यांची सामान्य प्रशासन विभागात तर फारुक यड्रावी यांची महसूल विभागात बदली करण्यात आली आहे.