वृत्तसंस्था / टोकियो
जपानमध्ये अलिकडच्या कालावधीत कोरोनाचे रूग्ण पुन्हा नव्याने आढळत असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे आयसीसीचे प्रमुख थॉमस बाक यांनी आपला जपानचा दौरा रद्द केल्याची माहिती टोकियो ऑलिंपिक आयोजन समितीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
आयसीसीचे प्रमुख थॉमस बाक हे पुढील सोमवारी जपानमधील हिरोशिमाला भेट देणार होते तसेच टोकियोकडे जाणाऱया ऑलिंपिक क्रीडाज्योतीच्या रिलेवेळी ते उपस्थित राहणार होते. कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमुळे जपान शासनाने टोकियोमध्ये तसेच हिरोशिमामध्ये आणीबाणीची मुदत 31 मे पर्यंत वाढविल्याने बाक यांचा जपानचा दौरा रद्द झाल्याची माहिती टोकियो ऑलिंपिक आयोजन समितीचे प्रमुख हाशीमोटो यांनी दिली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटनाला आता केवळ 10 आठवडे बाकी राहिले आहेत. कोरोना महामारीच्या धोक्यापासून सावध राहण्यावर प्राधान्य दिले असून कोरोना संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. जपानमध्ये इतर देशांच्या तुलनेत कोरोना परिस्थिती चिंताजनक झालेली नाही. आतापर्यंत या महामारीत जपानमध्ये सुमारे 11000 जणांचा बळी पडला आहे. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत जपानची स्थिती निश्चितच बरी म्हणावी लागेल.
येत्या जुलैमध्ये होणारी टोकियो ऑलिंपिक स्पर्धा कोरोना परिस्थितीमुळे रद्द करावी क। यासाठी ऑनलाईनवरून जनतेची मते आजमावण्यात आली. त्यानुसार तीन दिवसांच्या कालावधीत सदर स्पर्धा रद्द करावी, असे तीन लाख लोकांनी आपली मते व्यक्त केली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या क्रीडाज्योतीच्या प्रवासाला 25 मार्चपासून प्रारंभ झाला. दरम्यान कोरोना परिस्थितीमुळे किमान पाचवेळा या क्रीडाज्योतीच्या प्रवास मार्गामध्ये बदल करावा लागला.