एकूण रुग्ण संख्या 71 : दोन दिवसांत 45 रुग्ण दाखल : आणखी 13 रिपोर्ट निगेटिव्ह
- 29 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले
- होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येतही वाढ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी नव्याने 20 रुग्ण वाढल्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोना तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले असून नव्याने 29 रुग्णांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. सोमवारी पाठविण्यात आलेल्या 13 नमुन्यांचा कोरोना तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असली, तरी जिल्हय़ामध्ये काही लोक पास मिळवून येऊ लागले आहेत. त्यामुळे होम क्वारंटाईन, संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोनाची थोडीफार लक्षणे असणाऱया रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमधील रुग्ण बरे होत असले, तरी दाखल होण्याचेही प्रमाण वाढत आहे. रविवारी 25 रुग्ण बरे होऊन आयसोलेशन वॉर्डमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱया दिवशी सोमवारी 25 रुग्ण वाढले. मंगळवारी आणखी 20 रुग्ण वाढले. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. तसेच होम क्वारंटाईनमध्येही 17 व्यक्तींची वाढ होऊन 200 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्येही चौघांची वाढ होऊन 102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
29 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले
आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोना तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी नव्याने 29 रुग्णांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 316 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 287 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वगळता 286 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आता कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सद्यस्थितीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. दरम्यान सोमवारी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या तेराहीजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता 29 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तर आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी एकूण 2625 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
विलगीकरण व अलगीकरणात असलेल्या व्यक्ती आणि जिल्हय़ातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे. तसेच esanjeevaniopd.in या वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
घरीच अलगीकरण 0200
संस्थात्मक अलगीकरण 0102
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0316
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0287
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0286
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0029
विलगीकरण कक्षात दाखल 0071
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2625