ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 8 मार्चपासून होणार प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना मोफत शिक्षण व्यवस्था पुरवणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. यामुळे आरटीईअंतर्गत 2021-2022 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा मुहूर्त लागला आहे. मागील दोन वर्षापासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत झालेल्या बदलामुळे शहरातील केवळ 10 शाळांमधून आरटीईअंतर्गत प्रवेशाची मुभा देण्यात आली होती. नूतन शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची मार्गसूची नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आरटीई प्रवेशासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरटीईअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येणाऱया शाळांची यादी जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेश अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. प्रवेशाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे आरटीईतून प्रवेश देण्यात येणाऱया शाळा विचारात घेऊन पालकांना अर्ज करता येणार आहे. घरापासून जवळच सरकारी शाळा असणाऱया इतर इंग्रजी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामुळे प्रवेश घेणाऱयांची संख्या कमी झाली आहे.
मार्गदर्शक सूचीनुसार दि. 15 फेब्रुवारी रोजी सर्व शाळांची तात्काल यादी प्रसिद्ध होणार आहे. दि. 20 पर्यंत आक्षेपासाठी मुदत देण्यात आली आहे. दि. 25 फेब्रुवारी रोजी परिसरातील शाळांची यादी जाहीर केली जाईल. दि. 3 ते 4 मार्च दरम्यान प्रायोगिक अर्जाचे सादरीकरण होईल. यानंतर 8 मार्चपासून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला प्रारंभ होईल. अर्ज पडताळणी प्रक्रियेनंतर दि. 20 एप्रिल रोजी आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर होईल. सध्याचे शैक्षणिक वर्ष कोरोनामध्ये निघून गेले असले तरी 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे.
10 शाळांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया पार पडणार
याबाबत शिक्षणाधिकारी आण्णाप्पा पॅटी यांनी आरटीई प्रवेशाची मार्गसूची संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. नियमानुसार प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. बेळगावमध्ये 10 शाळांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविले आहे.