मोबाईल हिसकावून पलायन
वारणानगर/प्रतिनिधी
आरळे ता. पन्हाळा येथील रात्री जेवणानतंर ओढ्याच्या बाजूला फिरायला गेलेल्या तरुणास चार अज्ञातांनी बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईलही हिसकावून नेला आहे. जखमी तरूण विनायक हणमंत गायकवाड वय २९ रा.आरळे याने याबाबत कोडोली पोलीसात फिर्याद दिली आहे.
आरळे येथील ओढ्याजवळ शुक्रवार दि. १० रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास दोन मोटरसायकल लावून चार अनोळखी इसम दारू पिलेल्या अवस्थेत उभे होते. यावेळी फिर्यादी विनायक गायकवाड हे जेवणानतंर मोबाईलवर बोलत ओढ्याकडील बाजूला फिरत जात असताना तिथे थांबलेल्या इसमांनी विनायक यांना ऊसाच्या बुडक्याने बेदम मारहाण करत त्याच्याकडील मोबाईलही काढून घेतला. दरम्यान, रात्रीच्या वेळी गायकवाड यांच्यावर अज्ञाताकडून झालेल्या हल्यांची माहिती गावात सर्वत्र पसरली. तातडीने पोलीसही घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी हल्लेखोर पसार झाले होते.
घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल सांळोखे यानी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर पवार तपास करीत आहेत.