विराट कोहलीचा करिष्मा व इयॉन मॉर्गनच्या संयमी नेतृत्वाचा कस अपेक्षित
शारजाह / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी व इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआर यांच्यात आज (सोमवार दि. 11) होणाऱया आयपीएल एलिमिनेटर लढतीत खऱया अर्थाने लिटमस टेस्ट रंगणार आहे. विराटने या हंगामानंतर आरसीबी नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला असून त्यापूर्वी नेतृत्व कारकिर्दीची यथोचित सांगता करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
विराट कोहलीने कर्णधार या नात्याने आरसीबीला 2016 मधील आयपीएल आवृत्तीत फायनलपर्यंत धडक मारुन दिली. शिवाय, 2015 व 2020 मध्ये दोनवेळा प्ले-ऑफमध्ये स्थान प्राप्त करुन दिले. मात्र, आता कर्णधार या नात्याने शेवटची स्पर्धा खेळत असताना सातत्याने हुलकावणी देत असलेले जेतेपद खेचून देण्यासाठी विराट विशेष प्रयत्नशील असेल.
दुसरीकडे, इयॉन मॉर्गन केकेआरला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली देदीप्यमान यश संपादन केले असून 2012 व 2014 या 3 वर्षांच्या कालावधीत दोनवेळा जेतेपद मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. कागदावर दोन्ही संघांचे बलाबल समसमान भासू शकते. आरसीबीसाठी शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा शेवटच्या चेंडूवर मिळवलेला रोमांचक विजय अर्थातच मनोबल उंचावणारा असणार आहे.
केकेआर युएईत यशस्वी
कोलकाता नाईट रायडर्सने यंदा साखळी फेरीअखेर 14 गुण संपादन केले. मात्र, यात युएई लेगमध्ये त्यांनी मारलेली जोरदार मुसंडी लक्षवेधी ठरली. या संघाने युएईमधील दुसऱया टप्प्यात 7 पैकी 5 सामन्यात विजय खेचून आणत सर्वच संघांना धक्का दिला. या संघाने राजस्थानचा तब्बल 86 धावांनी फडशा पाडला आणि तेथेच त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झाले.
आरसीबी संघात एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, देवदत्त पडिक्कलसारखे अव्वल फलंदाज असून आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक विराट कोहलीकडे नेतृत्वाची धुरा आहे. मात्र, अद्याप त्यांना परफेक्ट कॉम्बिनेशन साधता आलेले नाही. आघाडीवीरांनी उत्तम फटकेबाजी केली असली तरी तिसऱया स्थानी डॅनिएल ख्रिस्तियनला खेळवण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटत राहिला आहे. अगदी एबी डीव्हिलियर्सला पाचव्या स्थानी खेळवण्याचा त्यांचा निर्णय देखील चुकीचा ठरत आला आहे. नवोदित केएस भरतला दिलेली संधी मात्र सार्थक ठरत आली आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या केएस भरतने मागील लढतीत तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरत 52 चेंडूत 78 धावांची आतषबाजी केली होती. तोच धडाका येथेही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.
हर्षल पटेलचे लक्षवेधी योगदान
आरसीबीतर्फे गोलंदाजीच्या आघाडीवर हर्षल पटेलने 14 सामन्यात 30 बळी घेतले असून यात मुंबई इंडियन्सविरुद्ध लढतीत घेतलेल्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे. मोहम्मद सिराज व गॅरटॉन देखील प्रभावी ठरत आले आहेत. वर्ल्डकप संघातून डच्चू मिळालेल्या यजुवेंद्र चहलने या हंगामात 16 बळी घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संभाव्य संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, रजत पाटीदार, दुष्मंता चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वणिंदू हसरंगा, जॉर्ज गॅरटॉन, यजुवेंद चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, एबी डीव्हिलियर्स.
केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शकीब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, टीम सेफर्ट.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.30 वा.
आरसीबीची भिस्त पुन्हा एकदा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलवर!
प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे अनेक खेळाडूंची कामगिरी संमिश्र स्वरुपाची ठरत आली आहे. दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहली देखील नेहमीचे सातत्य राखू शकलेला नाही. मागील दोन डावात तर तो कमालीचा अपयशी ठरला. पण, ग्लेन मॅक्सवेल मात्र दमदार सातत्य राखण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पॉवरहिटरने 498 धावांची आतषबाजी केली आहे आणि आज महत्त्वाच्या एलिमिनेटर लढतीत आरसीबीची बरीच भिस्त या दिग्गज खेळाडूवर देखील असणार आहे.
केकेआरचा करिष्मा वेंकटेश अय्यर-गिल-त्रिपाठीवर अवलंबून!
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरचा संघ यंदा साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला होता. आज फलंदाजीत वेंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा यांच्यावर केकेआरची प्रामुख्याने भिस्त असेल. हर्षल पटेल व चहल यांना हे फलंदाज कसे सामोरे जाणार, त्यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. कर्णधार मॉर्गनचा खराब फॉर्म मात्र केकेआरसाठी चिंतेचा आहे.