फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी दर्शविली तयारी, राजनाथसिंग यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला आणखी राफेल विमानांची आवश्यकता असेल तर ती पुरविण्यास आम्ही तयार आहोत, असे आश्वासन फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी दिले आहे. त्या भारताच्या दौऱयावर आल्या असून शुक्रवारी त्यांची भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी चर्चा झाली. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या वायुदलांचा आधारस्तंभ हे विमान आहे. यातून दोन्ही देश सामरिक भागीदारीच्या दृष्टीने एकमेकांच्या किती जवळ आहेत, हे दिसून येते. ही भागीदारी भविष्यकाळात वाढत जाईल, असा आशावाद पार्ली यांनी व्यक्त केला.
त्यांनी भारताच्या मेक इन इंडिया या धोरणाला पाठिंबा व्यक्त केला. भारताच्या अधिकाधिक उद्योजगांना फ्रान्सच्या जागतिक पुरवठा साखळय़ांमध्ये सहभागी करुन घेतले जाईल. राफेल विमानांसंबंधी भारतीय वायुदलाने समाधान व्यक्त केले आहे, ही आनंदाची बाब आहे. कोरोनाचे आव्हान असतानाही भारताला या प्रकारच्या 33 विमानांचा पुरवठा आम्ही वेळेत करु शकलो, ही बाब महत्वपूर्ण आहे. करारानुसार उरलेली 3 विमाने लवकरच पुरविण्यात येतील. भविष्यकाळातही राफेल विमानांसंबंधी चर्चा केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताच्या योजनेला पाठिंबा
भारत लवकरच आपल्या नौदलात दुसऱया विमानवाहू नौकेचा समावेश करणार आहे. या नौकेसाठी अनुकूल अशा प्रकारची युद्ध विमाने भारताला हवी असल्यास फ्रान्स तशी व्यवस्था करण्यात तयार आहे. भारत लवकरच आपली पहिली स्वदेशनिर्मित विमानवाहू नौका ‘विक्रांत’ देशाच्या नौदलात समाविष्ट करणार आहे. आपल्या संरक्षणासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना फ्रान्स सहकार्य करण्यात तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथसिंग यांच्याशी चर्चा
भारताशी संरक्षण सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी फ्रान्स नेहमीच उत्सुक आहे. याच उद्देशासाठी आपला हा भारत दौरा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. शुक्रवारी दुपारी त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संरक्षण साधनाची खरेदी, तंत्रज्ञान हस्तांतरण, सुरक्षा सहकार्य आणि संरक्षणविषयक जागतिक परिस्थिती या मुद्दय़ांवर त्यांच्यात चर्चा झाली.
इतर बाबींमध्येही सहकार्य
संरक्षण क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांमध्येही भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्य वाढत आहे. दहशतवादविरोध, पर्यावरण संरक्षण, व्यापार आणि आर्थिक गुंतवणूक इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीविषयी दोन्ही देश सतर्क असून तेथील सर्व समाजघटकांना सरकारमध्ये समाविष्ट केले पाहिजे, असे दोन्ही देशांचे ठाम मत आहे. यासंबंधीही चर्चा करण्यात आली.
पर्यावरण चिंतेचा विषय
पर्यावरणाचा ऱहास हा साऱया जगाच्या चिंतेचा विषय आहे. हा ऱहास रोखला नाही तर मानवी जीवनाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते याची जाणीव आज सर्व देशांना झाली आहे. पॅरीस कराराच्या तत्वांचे पालन भारताने गंभीरपणे करण्यास प्रारंभ केला असून या संदर्भात भारतापासून जगाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात अनेक जागतिक विषयांवर एकमत असून आमची विचारांची पद्धत समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औकसबद्दल नाराजी
फ्रान्सला विश्वासात न घेता अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने नवी आघाडी तयार केली. त्यासंबंधी पार्ली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑस्टेलिया फ्रान्सकडून 12 पाणबुडय़ा विकत घेणार होता. तो करार या नव्या आघाडीमुळे रद्द झाला. त्यावर फ्रान्सने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पार्ली यांनी या मुद्दय़ालाही स्पर्श करत या घडामोडी निराशाजनक असल्याचे स्पष्ट केले.
सहकार्य दृढतेच्या दिशेने
ड भारत-फ्रान्स धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ होणार
ड अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा करण्याची फ्रान्सची तयारी
ड अफगाणिस्तानसंबंधी दोन्ही देशांचे धोरणात्मक एकमत
ड संरक्षणासह इतर क्षेत्रातही भारत-फ्रान्स एकत्र येणार