प्रतिनिधी/ नागठाणे
सुट्टीनिमित आसनगाव (ता. सातारा) येथे गावी आलेल्या सैनिकाच्या बँक अकाऊंटमधून परस्पर पैसे काढून घेण्याचा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकरणात अज्ञाताने त्यांच्या बैंक अकाऊंटमधील 7.50 लाख रुपये लांबविले. काही मिनिटांतच घडलेल्या या प्रकारामुळे चक्रावलेल्या सैनिकाने तत्काळ बोरगाव पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. प्रमोद शंकर पवार (वय 23) असे फसवणूक झालेल्या सैनिकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पवार हे तीन वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत असून सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे डय़ुटीवर आहेत. आसनगाव येथे घर बांधावयाचे असल्याने ते सध्या सुट्टीवर गावी आले आहेत. घर बांधण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज शाखेतून 11 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्यापैकी 1.50 लाख रुपये बांधकाम व्यवसायिकाला दिले तर 2 लाख रुपये दुसऱया बँकेच्या कर्जापोटी भरले होते.त्यांच्या अकाऊंट ला 7.50 लाख रुपये शिल्लक होते.
गुरुवारी सकाळी ते घरी असताना माहे 2021 च्या क्रेडिट कार्डपोटी 28 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलला आला. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्यांना एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांनी ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यांना बँकेचा अकाउंट नंबर विचारला. त्यांनी अकाउंट नंबर दिल्यानंतर पाच मिनिटांतच त्यांच्या मोबाईलवर डेबिट मेसेज पडले.
यावेळी अज्ञाताने त्यांच्या अकाउंटमधून काही मिनिटांतच टप्प्याटप्प्याने 7.50 लाख रुपये काढून घेतले. अकाऊंटमधून पैसे गेल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा सायबर सेलकडे धाव घेत माहिती दिली. यावेळी त्यांचे पैसे हे कर्नाटका बँकेच्या अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात आल्यावर प्रमोद पवार यांनी सातारा येथील कर्नाटका बँकेशी संपर्क साधला. तेथे त्यांना पैसे तेथूनही दुसऱया अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचे समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.