सातारा / प्रतिनिधी :
कोरेगाव तालुक्यात पुनर्वसित आसरे गावात 1979 सालापासून ते आजमितीपर्यंत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात राखून व प्रशासनानातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन धोम प्रकल्पग्रस्त समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष व निवृत्त शिक्षक तुकाराम जगन्नाथ सणस यांनी आसरे येथील शासनाची जमीन बळकावून काही जमीन विक्री केली आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन तत्कालीन अधिकाऱ्यांसह सणस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखला करावा, अशी मागणी आसरेच्या ग्रामस्थांनी केली.
आसरे येथील या भूखंड घोटाळय़ाची माहिती देण्यासाठी सातारा शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस महेंद्र आनंद सणस, धर्मेंद्र चिमाजी सणस, रामचंद्र मारुती सणस, लक्ष्मण सीताराम सणस, ग्रामपंचायत सदस्य रुपेश सीताराम सपकाळ व अनिल गेनुबा सणस उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, आसरे हे पुर्नवसित गावात सणस यांनी त्यांची आई वेणूताई जगन्नाथ सणस यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीर जमीन बळकावली आहे. या प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी तुकाराम सणस व त्यांची आई दोषी आढळल्याने कारवाई करण्यासाठी पुनर्वसन आयुक्त जोशी साहेब यांच्याकडून मार्गदर्शन मागवले आहे. तर तुकाराम सणस यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून बेकायदेशीरपणे आसरे येथे जादा भूखंड मिळविले आहेत. सदर भूखंडाच्या ग्रा प नोंदीत मंजूर आदेशपेक्षा 2000 चौरस फूट जादा जागेची अशी एकूण 4 हजार चौरस फूट जादा जागेची केलेली नोंद कमी करण्याबाबत कोरेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे.