वृत्तसंस्था/ कराची
इंग्लंडचा क्रिकेट संघ तब्बल 16 वर्षांनंतर पाकचा दौरा करणार असल्याची अधिकृत माहिती पाक क्रिकेट मंडळाने दिली आहे. इंग्लंडचा हा पाक दौरा ऑक्टोबर महिन्यात राहील.
इंग्लंडचा क्रिकेट संघ 2005 सालानंतर पहिल्यांदाच पाकचा दौरा करीत आहे. या आगामी दौऱयात इंग्लंडचा संघ पाकबरोबर टी-20 चे दोन सामने खेळणार आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हे सामने 13 आणि 14 ऑक्टोबरला होणार आहेत. न्यूझीलंडचा क्रिकेट संघही तब्बल 18 वर्षांनंतर सप्टेंबर महिन्यात पाकचा दौरा करीत आहे. आगामी सात महिन्यांच्या कालावधीत विंडीज आणि ऑस्ट्रेलियाचे संघही पाकचा दौरा करणार असल्याची माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे. अलीकडे पाकमधील परिस्थिती खूपच सुधारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सुरक्षा स्थितीमध्ये चांगलीच सुधारणा झाली असल्याने नजीकच्या काळात पाकमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्याने सुरू होईल. 2012 आणि 2015 साली पाक आणि इंग्लंड यांच्यातील मालिका त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविल्या गेल्या होत्या.
इंग्लंडचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे इस्लामाबादमध्ये 9 ऑक्टोबरला आगमन होणार आहे. इंग्लंड आणि पाक पुरुष आणि महिला संघातील टी-20 चे दोन सामने 14 आणि 15 ऑक्टोबरला खेळविले जातील. दरम्यान, इंग्लंडचा महिला संघ पाकबरोबर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने 17, 19 आणि 21 ऑक्टोबरला रावळपिंडी स्टेडियममध्ये होणार आहेत.