वृत्तसंस्था/ लंडन
सॅम करनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुरुवारी यजमान इंग्लंडने दुसऱया वनडे सामन्यात लंकेचा 8 गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ब्रिस्टॉलमध्ये रविवारी खेळविला जाणार आहे.
या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 50 षटकात 9 बाद 241 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 43 षटकात 2 बाद 244 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. 48 धावात 5 गडी बाद करणाऱया सॅम करनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
लंकेच्या डावामध्ये धनंजय डिसिल्वाने चिवट फलंदाजी करत 91 चेंडूत 13 चौकारासह 91 धावा झळकाविल्या. शनाकाने 1 षटकार आणि 2 चौकारासह 67 चेंडूत 47, हसरंगाने 49 चेंडूत 2 चौकारासह 26, करुणारत्नेने 1 चौकारासह 21, बी. फर्नांडोने 3 चौकारासह 17 आणि चमिराने 1 षटकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. करनच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची एकवेळ स्थिती 7 षटकात 4 बाद 21 अशी केविलवाणी झाली होती. डिसिल्वा आणि हसरंगा यांनी पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी केली. हसरंगा बाद झाल्यानंतर डिसिल्वाने शनाकासमवेत सहाव्या गडय़ासाठी 78 धावांची भर घातली. इंग्लंडतर्फे करनने 48 धावांत 5 तर विलीने 64 धावात 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला रॉय आणि बेअरस्टो यांनी सलामीच्या गडय़ासाठी 76 धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 29 धावा जमविल्या. डिसिल्वाने बेअरस्टोचा त्रिफळा उडविला. जेसन रॉयने 52 चेंडूत 10 चौकारासह 60 धावांचे योगदान दिले. करुणारत्नेने त्याला झेलबाद केले. 17.1 षटकात इंग्लंडने 2 बाद 104 धावा जमविल्या होत्या. रुट आणि कर्णधार मॉर्गन या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 140 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 7 षटके बाकी ठेवून 8 गडय़ांनी विजय मिळवून दिला. रुटने 87 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 68 तर मॉर्गनने 83 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 75 धावा झळकविल्या. लंकेतर्फे हसरंगा आणि करुणारत्ने यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः लंका 50 षटकात 9 बाद 241 (डिसिल्वा 91, शनाका 47, हसरंगा 26, करुणारत्ने 21, बी. फर्नांडो 17, चमिरा नाबाद 14, सॅम करन 5-48, विली 4-64), इंग्लंड 43 षटकात 2 बाद 244 (मॉर्गन नाबाद 75, रुट नाबाद 68, रॉय 60, बेअरस्टो 29, हसरंगा 1-46, करुणारत्ने 1-34)