वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडच्या इलेन व्हाईटने सर्वाधिक गोल नोंदवण्याचा नवा विक्रम नोंदवला असून महिला विश्वचषक पात्रता फुटबॉल सामन्यात इंग्लंडने लॅटव्हियाचा 20-0 असा दणदणीत पराभव केला. आजवरचा त्यांचा हा सर्वात मोठा विजय आहे.
व्हाईटने प्रारंभी दोन गोल नोंदवून केली स्मिथच्या सर्वाधिक 46 गोल नोंदवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. नंतर उत्तरार्धात तिने हॅट्ट्रिक पूर्ण करीत स्मिथला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला. मँचेस्टर सिटीकडून खेळणारी व्हाईट ही काल झालेल्या सामन्यांत हॅट्ट्रिक नोंदवणारी चौथी खेळाडू होती. लॉरेन हेम्पने 4, बेथ मीड व बदली खेळाडू ऍलेसिया रुसो यांनीही हॅट्ट्रिक नोंदवली. याशिवाय बेथ इंग्लंडने 2, इला टून, जॉर्जिया स्टॅनवे, जेस कार्टर, जिल स्कॉट, जॉर्डन नॉब्स यांनी एकेक गोल केले. इंग्लंडने यापूर्वी 2005 मध्ये हंगेरीवर 13-0 असा सर्वात मोठा विजय मिळविला होता. त्यांचा हा गट ड मधील सहा सामन्यातील सहावा विजय होता. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत इंग्लंडने 53 गोल नोंदवले आहेत तर प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी एकही गोल बहाल केलेला नाही.