वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान विंडीजने इंग्लंडचा 3-2 असा पराभव करून मालिका विजय मिळविला. या मालिकेतील रविवारी झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 17 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकांत 4 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 19.5 षटकांत 162 धावांत आटोपला.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या किंगने 31 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34, मेयर्सने 19 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 31, शेफर्डने 1 षटकारांसह 6, पुरनने 24 चेंडूत 1 षटकारांसह 21, कर्णधार पोलार्डने 25 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 41 तर आर. पॉवेलने 17 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 35 धावा झळकविल्या. पोलार्ड आणि पॉवेल या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 32 चेंडूत अभेद्य 74 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या डावात 12 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे आदिल रशीद आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात व्हिन्सेने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 55, बँटनने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, कर्णधार मोईन अलीने 14, बिलिंग्जने 28 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 41 धावा जमविल्या. इंग्लंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. इंग्लंडचा डाव 19.5 षटकांत 162 धावांत आटोपला. इंग्लंडच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जेसन होल्डरने 27 धावांत 5 बळी मिळविताना हॅट्ट्रिक नोंदवली तर अकिल हुसेनने 30 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकांत 4 बाद 179 (किंग 34, मेयर्स 31, शेफर्ड 6, पुरन 21, पोलार्ड नाबाद 41, पॉवेल नाबाद 35, अदिल रशीद 2-17, लिव्हिंगस्टोन 2-17), इंग्लंड 19.5 षटकांत सर्वबाद 162 (व्हिन्से 55, बिलिंग्ज 41, बँटन 16, मोईन अली 14, होल्डर 5-27, अकिल हुसेन 4-30, स्मित 1-41).