रोम
कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध यांच्या जोखडातून मुक्त झालेल्या इटलीत लवकरच लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू होणार असून यानिमित्ताने कँडी (चॉकलेट)उत्पादनाला वेग आला आहे. इटलीमध्ये विवाह समारंभांना लवकरच सुरुवात होणार असून हा हंगाम साधण्यासाठी याच्याशी संबंधित असणारे व्यावसायिक आता आपल्या तयारीला लागले आहेत. याचा सर्वाधिक आनंद सुल्मोना येथील कँडी निर्मात्यांना झालेला आहे. यांचा व्यवसाय विवाहाच्या हंगामादरम्यान मोठय़ा प्रमाणात चालतो, असे दिसून आले आहे. यांनी बनवलेली खास साखरेची बदामयुक्त कँडी तर विवाहेच्छुक महिलांना जास्त करून पसंत पडतात. लग्नातील वधू बदाम कँडी थोडा भाग घेतल्यानंतर मगच सर्व पै-पाहुण्यांना दिली जाते. सुल्मोनामध्ये सध्या विविध कारखान्यांमध्ये कामगार तांब्याच्या मोठय़ा भांडय़ांमध्ये बदाम भाजून चॉकलेट बनवायची तयारी करताना दिसत आहेत. सुल्मोनातील ओव्हीड अव्हेन्यूमध्ये कँडीची दुकाने चॉकलेटस्नी सजली आहेत.