सूडाकरता बिथरला इराण – कॉम्प्युटर व्हायरसच्या मदतीने नष्ट झाली यंत्रणा
वृत्तसंस्था / तेहरान
इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या अणुबॉम्ब ‘निर्मिती’च्या प्रयत्नांवर बोळा फिरविला आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या गुप्तपथकाने बॉम्बस्फोट घडवून आणत इराणचे मुख्य आण्विक संयंत्र नतांजची वीजपुरवठा व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. मोसादच्या कारवाईमुळे इराणला आता पुन्हा युरेनियमचे संपृक्तीकरण करण्यासाठी किमान 9 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर इस्रायलच्या कारवाईमुळे इराण पेटून उठला आहे. इराणच्या विदेश मंत्र्यांनी सूड घेण्याची धमकी दिली आहे.
इस्रायलची कारवाई ‘आण्विक दहशतवाद’ असल्याचे इराणने म्हटले आहे. आण्विक संयंत्रामध्ये झालेला स्फोट प्रचंड तीव्रतेचा असल्याने पूर्ण प्रकल्प काळोखात बुडाला आहे. या हल्ल्यात आण्विक केंद्राचे सेंट्रीफ्यूज नष्ट झाले असून त्याचा वापर युरेनियम संपृक्तीकरणासाठी केला जतो. या स्फोटामुळे अत्यंत कडेकोट सुरक्षेत असलेल्या आण्विक संयत्रांच्या सुरक्षेवरून पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
नतांजमध्ये अणुबॉम्बची निर्मिती
नतांज केंद्र इराणच्या सर्वात सुरक्षित स्थळांपैकी एक मानले जाते. इराण येथेच युरेनियमचे संपृक्तीकरण करून अणुबॉम्ब निर्मितीचे स्वप्न पूर्ण करू पाहत असल्याचे मानण्यात येते. इराणने युरेनियमच्या संपृक्तीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू केले होते. आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचा इराणचा दावा असला तरीही त्याबद्दल संशय व्यक्त होत असतो. इराणने भूमिगत नतांज आण्विक केंद्रावरील हल्ल्याप्रकरणी सोमवारी इस्रायलला जबाबदार ठरविले आहे. या हल्ल्याचा सूड घेणार असल्याची धमकी इराणने दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलने थेट स्वरुपात स्वीकारलेली नाही.
इस्रायलला धडा शिकवू
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांची रविवारी भेट घेतलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इराणसोबतचा आण्विक करार रोखण्यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न करणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. नतांजचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचा सूड घेतला जाणार आहे. इस्रायलला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवू असे उद्गार इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादा यांनी काढले आहेत. नतांजला अधिक विकसित यंत्रणेसह निर्माण केले जाणार आहे. इस्रायलचा हल्ला आण्विक कराराला वाचविण्यासाठी व्हिएन्नात सुरू असलेल्या चर्चेला संकटात टाकणारा आहे. निर्बंध हटविण्याच्या मार्गावरील यशामुळेच इराणच्या लोकांकडून इस्रायल सूड उगवू पाहत आहे. पण आम्ही असे घडू देणार नाही, या कृत्याचा सूड घेणारच असे इराणचे विदेशमंत्री जवाद जरीफ यांनी म्हटले आहे.
नतांजमध्ये यापूर्वीही कारवाई
नतांजला यापूर्वीही लक्ष्य करण्यात आले होते. स्टक्सनेट कॉम्प्युटर व्हायरसद्वारे नतांजमधील इराणी सेंट्रीफ्यूज नष्ट करण्यात आला होता. स्टक्सनेटबद्दल 2010 मध्ये समजले हेते. हा कॉम्प्युटर व्हायरस अमेरिका-इस्रायलकडून निर्माण करण्यात आल्याचे मानले जाते. नतांजच्या संयत्रात मागील वर्षी जुलैमध्ये एक रहस्यमय स्फोट झाला होता. इराणच्या सैन्य आण्विक कार्यक्रमाची अनेक दशकांपूर्वी सुरुवात करणाऱया वैज्ञानिकाच्या हत्येप्रकरणी इस्रायलवरच संशय व्यक्त करण्यात आला होता.