इक्रा संस्थेचा अंदाज : दुचाकींचा वाटा 8 ते 10 टक्के राहणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रीक वाहनांना मिळणारी लोकप्रियता पाहता 2025 पर्यंत सदरच्या वाहनांच्या विक्रीत वेगाने वाढ होणार असल्याचा अंदाज इक्रा या संस्थेने व्यक्त केला आहे. यात 10 टक्के वाटा इलेक्ट्रीक स्कूटर्सचा असणार आहे, असेही संस्थेने म्हटले आहे.
इलेक्ट्रीक वाहनांप्रती ग्राहकांचा कल वाढतो आहे. रेटिंग एजन्सी आयसीआरए (इक्रा) यांच्या माहितीनुसार 2025 पर्यंत देशात विक्री होणाऱया दुचाकींमध्ये इलेक्ट्रीक दुचाकींचा वाटा 8 ते 10 टक्के इतका असणार आहे. याशिवाय तिचाकी इलेक्ट्रीक वाहनांचा वापरही वाढणार असून हा वाटा 30 टक्क्यांवर पोहचणार असल्याचा अंदाज आहे. कमी देखभाल खर्च व आकर्षक सवलत या कारणास्तव इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसते आहे. दुसरीकडे कार व ट्रकचा विचार करता इलेक्ट्रीकवर आधारीत या वाहनांचा बाजारातील वाटा वाढण्यासाठी थोडा जास्त कालावधी जावा लागणार आहे. मागच्या वर्षाचा विचार करता एकूण कार विक्रीतील इलेक्ट्रीक कार्सचा वाटा 4.4 टक्के इतका राहिला आहे. हा वाटा यंदा फारतर 5 टक्क्यांवर पोहचणार असल्याचा अंदाज इक्रा संस्थेने वर्तवला आहे.
तीन चाकी इलेक्ट्रीक गाडय़ांचा विचार करता सीएनजीपेक्षा इलेक्ट्रीक स्वस्त पडते. या गाडय़ांच्या विक्रीत वाढ होत आहे. भारत अशाप्रकारे इलेक्ट्रीक दुचाकी, तिचाकी निर्मिती करण्यात जगभरात अग्रेसर देश बनू शकतो. पुढील 4 वर्षामध्ये यांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते. पण कारच्या गटात पिछाडी होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे गाडय़ांच्या विक्रीवर परिणाम जाणवला होता.
सुविधांची गरज इक्राच्या मते, महत्त्वाचे सुटेभाग आणि चार्जिंग पायाभूत सुविधांवर जास्तीत जास्त भर दिला जाणे आगामी काळात आवश्यक ठरणार आहे. तसे झाल्यास इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे अनेकांचा ओढा वाढेल. दुसरीकडे इलेक्ट्रीक कार्सना मागणी वाढायची असेल तर त्यांच्या बॅटरीची किंमत 40 टक्के इतकी कमी केली जायला हवी