प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील विजय पाटील या शेतकऱ्याच्या शेडमधील शेळयांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. यामध्ये या कुत्र्यांच्या टोळीने २२ शेळयांचा फडशा पाडला. दरम्यान के. बी. पी. कॉलेज रस्त्यावर एका भटक्या कुत्र्याने रमेश पवार यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महाडीक युवा शक्तीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देवून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासन गंभीर नाही.
विजय पाटील हे अभियंता आहेत. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील स्वत:च्या जागेत शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्या शेडमध्ये २२ शेळ्या होत्या. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने या शेडमध्ये शिरुन या शेळयांना ठार केले. यामध्ये पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. सकाळी पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी पोलीस ठाण्यासह नगरपालिका व अन्य प्रशासकीय कार्यालयात जाऊन याबाबत माहिती दिली.
मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तर पशुवैद्यकीय विभागाने पंचनामा केला आहे. कुत्र्यांच्या वाढत्या टोळयांनी शहरातील नागरीक असुरक्षित आहेत. पालिका प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, सागर जाधव, किशोर पाटील व मनसेचे सतीश पवार यांनी केली आहे.