स्थलांतरित झालेल्यांना घरासारखी चव देण्याचा प्रयत्न : शहरातील इजिपुरा येथे विविध प्रकारची दालने सज्ज
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या इजिपुरामध्ये आता ईशान्येतील राज्यांच्या स्थलांतरित लोकांसाठी एक बाजारपेठ विकसित होऊ लागली आहे. तेथे आता ‘7 सिस्टर्स नॉर्थइस्ट शॉप, एनिथिंग नॉर्थइस्ट’ अशी नावे असलेली दुकाने दिसून येत आहेत. या भागात ईशान्येतील आहारात सामील मांसाचे प्रकार, बांबूंमध्ये भरून वाढण्यात येणारे खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. मणिपूरमधील प्रसिद्ध सिराराखोंग मिरच्यांची पूड तेथे उपलब्ध होते. कोरियन इन्स्टंट नुडल्स मिळू लागल्याने ईशान्येतून शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांना घरासारखी चव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथील स्मोक्ड मीट गोव्यातही पाठविण्यात येते. बाजारपेठेला मोठय़ा प्रमाणात ग्राहक मिळू लागल्याने अनेक व्यावसायिकांनी विस्ताराचे प्रयत्न चालविले आहे. अनेकांनी ईशान्येतील स्वतःच्या नातलगांना मदतीसाठी बोलाविले आहे. इजिपुरा तसेच परिसरात ईशान्येतील तरुण-तरुणींचे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य आहे. याचमुळे या भागात नॉर्थइस्ट शॉप म्हणून ओळखल्या जाणाऱया दुकानांमध्ये ईशान्येतील ताज्या भाज्या, मासे आणि सुकामेका मिळत आहे. हे पदार्थ म्यानमार, कोरिया, बांगलादेश आणि नेपाळमधून मागवण्यात येत आहे. या दुकानांमुळे घरापासून दूर राहिल्याची फारशी जाणीव होत नसल्याची प्रतिक्रिया या ईशान्येतील तरुण-तरुणींनी व्यक्त केली आहे.
मागील दशकात ईशान्येतील संघर्षामुळे तेथील तरुण-तरुणींनी रोजगाराच्या शोधात देशातील महानगरांमध्ये धाव घेतली होती. या तरुण-तरुणींनी प्रामुख्याने हॉटेल्स, मॉल्स, कॉल सेंटर्ससारख्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली होती. ईशान्येतील हजारो तरुण-तरुणी दरवर्षी बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद यासारख्या महानगरांमध्ये दाखल होत असतात. दिल्लीतील हुमायूपूर तर बेंगळूरमध्ये इजिपुरा येथे त्यांचे वास्तव्य दिसून येते. या परिसरात त्यांचा प्रभाव भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टय़ा दिसून येतो.
अन्य भागातील लोकही चाखत आहेत चव
इजिपुरातील दुकानदार 2015 पर्यंत प्रामुख्याने व्हॉट्सऍपद्वारे विक्री करत होते. पण मागणी अधिक असल्याचे आढळून आल्यावर त्यांनी मोठे स्टोअर उघडून ईशान्येतील बांधवांची गरज भागविण्याचे धोरण अवलंबिले आहे. इजिपुरातील दुकानदारांना स्थानिक लोक एखादा खाद्यपदार्थ कसा तयार करता? याकरता कुठली सामग्री वापरता, हे मणिपूरमधील आहे का? हे चीनमधून आले आहे का असे प्रश्न विचारत असतात. ईशान्येतील लोकांसोबतच आता अन्य भागातील लोकही या खाद्यपदार्थांची चव चाखू लागले आहेत.
वेगळय़ा खाद्यसंस्कृतीची ओळख अनेक मल्याळी लोकांनी पोर्क आणि सुके मासे खरेदी केले आहेत. तसेच बांबूंमधील खाद्यसामग्रीला पसंती दर्शविली आहे. ईशान्येतील तरुण-तरुणी स्वतःच्या सोबत स्थानिक मित्रमैत्रिणींना आणत असल्याने त्यांनाही या वेगळय़ा खाद्यसंस्कृतीची ओळख होऊ लागली आहे. ईशान्येतील खाद्यपदार्थ, विशेषकरून नागा आहार मध्यमवर्गीय भारतीयांमध्ये लोकप्रिय वांशिक भोजन ठरू लागले आहे. वंशद्वेष अद्याप कायम असला तरीही त्यावर अशा सांस्कृतिक सरमिसळच्या माध्यमातून मात करता येणार आहे.