भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध ः दलित, ओबीसी, महिलांसाठी अनेक आश्वासने
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्वतःचे घोषणापत्र जारी केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हे संकल्पपत्र सादर करण्यात आले. या घोषणापत्राद्वारे भाजपने दलित, ओबीसी, महिला, तरुणाई आणि शेतकऱयांना अनेक प्रकारची आश्वासने दिली आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भाजपने स्वतःचे घोषणापत्र म्हणजेच जनकल्याण संकल्पपत्र सादर केले आहे. वर्षात दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या आश्वासनासह प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मोफत स्कुटी देणार असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच उत्तरप्रदेशला देशातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. दलित, ओबीसी, तरुणाई, शेतकरी अणि महिलांसाठी अनेक आश्वासने असली तरीही मुस्लिमांसाठी विशेष घोषणा करण्यात आलेली नाही.
लव्ह जिहाद प्रकरणातील गुन्हेगारांना कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
शेतकऱयांना दिलेली आश्वासने..
उत्तरप्रदेशात शेतकऱयांना स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी भाजपने अनेक आश्वासने दिली असून यात मोफत सिंचनासह एमएसपीवर पिक खरेदीचा मुद्दा सामील आहे. ऊस उत्पादकांना 14 दिवसांच्या आत रक्कम मिळवून देणार असल्याचे सांगण्यात आले.
-राज्यात पुढील 5 वर्षामध्ये सर्व शेतकऱयांना सिंचनासाठी मोफत वीज मिळणार
-ऊस उत्पादकांना 14 दिवसांच्या आत मिळणार बिल, विलंब झाल्यास व्याज
-शेतकऱयांसाठी राज्यात 5 हजार कोटींची कृषी सिंचन योजना
-बटाटा, टॉमेटो, कांदा यासारख्या पिकांवर हमीभाव देणार
-साखर कारखान्यांचे नुतनीकरण अन् आधुनिकीकरण हाणार
-पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतकऱयांना सौरपंप देणार
-नैसर्गिक शेती मोहीम अंतर्गत प्रत्येक गावात नैसर्शिक शेतीला चालना
-निषादराज बोट अनुदान योजना सुरू करणार, मच्छिमारांना लाभ
-मत्स्यबीज उत्पादन प्रकल्पासाठी 25 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार
महिलांसाठीची आश्वासने...
भाजपने उत्तरप्रदेशात निम्मी लोकसंख्या म्हणजेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यात वर्षात दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यापासून निवृत्तीवेतन वाढविण्याचा मुद्दा सामील आहे.
-उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत होळी अन् दिवाळीला प्रत्येकी एक सिलिंडर मोफत
-60 वर्षांपेक्षा अधिक महिलांना मोफत प्रवासाची सुविधा
-विधवा आणि निराश्रित महिलेला 1500 रुपये प्रतिमहिना पेन्शन देणार
-कन्या सुमंगला योजनेचा लाभ 15 हजारांवरून 25 हजार करणार
-गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत
-मिशन पिंक टॉयलेटसाठी 1 हजार कोटींचा निधी
-3 नव्या महिला पोलीस बटालियन
-सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
-अवंती बाई लोधी स्वयंसहाय्य समूह मोहीम सुरू करणार
-युपीपीएसी समवेत सर्व शासकीय नोकऱयांमध्ये महिलांची संख्या दुप्पट
-1 कोटी महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी अल्प व्याजदरावर कर्ज
तरुणाई अन् विद्यार्थ्यांकरता….
-महाविद्यालयात जाणाऱया प्रत्येक विद्यार्थिनीला मोफत स्कुटी
-प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देणार
-सर्व विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी प्रतिबद्ध
-स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग
-राज्यात जागतिक स्तराचे विद्यापीठ सुरू करणार
-2 कोटी टॅबलेट किंवा स्मार्टफोन मोफत देणार
-तरुणाईसाठी गावात व्यायामशाळा आणि क्रीडामैदान
-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पट करणार
दलित अन् ओबीसींसाठी घोषणा
भाजपने राज्यातील दलित आणि ओबीसी समुदायासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. संबंधित समुदायांच्या महापुरुषांच्या नावावर संस्था सुरू करण्याची घोषणा यात सामील आहे.
-दलित, वंचित, मागास समुदायाच्या लोकांना घरासाठी भूखंड देणार
-मागासवर्गाच्या सदस्याला 15 दिवसात जन्मप्रमाणपत्रासह जात प्रमाणपत्र
-अनुसूचित जातीय लोकांनाही जन्म अन् जात प्रमाणपत्र देणार
-ओबीसी समुदायाच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची सुविधा
-सर्व जिल्हय़ांमध्ये संत रविदास मोहिमेंतर्गत राजकीय आश्रम पद्धती विद्यालय
-मेरठमध्ये कोतवाल धनसिंह गुर्जर अत्याधुनिक पोलीस प्रशिक्षण केंद्र
-बहराइचमध्ये महाराज सुहेलदेव यांच्या स्मारकाची निर्मिती