ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रेणी गावात मोठा हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आहे. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, हरिद्वारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.
हिमकडा कोसळल्याने जोशीमठ धरणाचा कडाही तुटला आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले असून, काही घरे आणि माणसेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य हाती घेतले आहे.
या दुर्घनेमुळे ऋषिगंगा वीजनिर्मिती प्रकल्प तसेच तपोवनमध्ये चमोली हायड्रो पॉवर प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.