देहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून रविवारी पुष्करसिंह धामी यांनी रविवारी शपथ घेतली. धामी यांच्याबरोबरच अन्य 11 जणांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल बबीराणी मौर्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील लॉनवर काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधीचा सोहळा पार पडला. धामी यांच्या मंत्रिमंडळात सध्या पूर्वीच्याच सर्व मंत्र्यांना समाविष्ट करण्यात आले असून एकही नवा चेहरा समाविष्ट नाही.
45 वर्षीय पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. तीरथसिंह रावत यांच्या जागी आता धामी यांची वर्णी लागली असून ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. ते उधमसिंगनगर जिल्हय़ातील खाटिमा मतदारसंघातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून अवघ्या वर्षभरात प्रभावी काम करून दाखविण्याचे आव्हान धामी यांच्यासमोर आहे.