गोवा, उत्तराखंडमध्येही सरशी शक्य, आपची पंजाबमध्ये मुसंडी : एक्झिट पोलचे अनुमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्षांनाही प्रसिद्धी देण्यात आली आहे. या निष्कर्षांनुसार भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये पूर्ण बहुमतांची सरकारे स्थापन करण्याची शक्यता आहे. तसेच उत्तराखंड आणि गोवा येथे मोठी चुरस असली तरी या राज्यांमध्येही भाजप अंतिमतः यशस्वी ठरु शकतो. पंजाबमध्ये मात्र, काँगेसचा पराभव होणार असून आम आदमी पक्ष तेथे मोठय़ा बहुमताची मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. इतर राज्यांमध्ये मतदान या आधीच पार पडलेले होते. सोमवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) आकडे प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. या आकडय़ांची सरासरी काढली असता उत्तर प्रदेशात भाजप सलग दुसऱयांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापणार, असे चित्र दिसत आहे. मणिपूरमध्येही हा पक्ष पूर्ण बहुमत स्वबळावर मिळवेल अशी शक्यता आहे. गोवा आणि उत्तराखंड येथे स्थिती स्पष्ट नसली तरी तेथेही भाजप सत्तास्पर्धेत असेल असे या आकडेवारीवरुन स्पष्ट होताना दिसत आहे. काँगेस पक्षाची दुर्दशा मात्र संपण्याची चिन्हे नसून त्या पक्षाला पंजाब गमवावा लागणार आणि आपला तेथे संधी मिळणार असेही या सर्वेक्षणांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्ष परिणाम येत्या गुरुवारी
मतदानोत्तर सर्वेक्षणे किंवा एक्झिट पोल यांचे निष्कर्ष प्रत्यक्ष परिणामांची दिशा दाखवत असले तरी ते चुकू शकतात असे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे या निष्कर्षांची विश्वासार्हता नेहमीच प्रश्नचिन्हांकित राहिली आहे. त्यामुळे ही सर्वेक्षणे काहीही म्हणत असली तरी येत्या गुरुवारी मतगणनेनंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष परिणामांची उत्सुकता आहे.
एक महिन्याची प्रतीक्षा
पाच राज्यांमधील मतदानाला प्रारंभ होऊन प्रत्यक्ष परिणाम येण्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागली आहे. आता 10 मार्चला या प्रक्रियेची सांगता होणार असून मतगणनेची सर्व सज्जता केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. या पाचही राज्यांमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता मतगणनेला प्रारंभ होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्ये आणि अनुमाने
उत्तर प्रदेश
सर्वेक्षण संस्था भाजप सप बसप काँगेस इतर
एक्सिस माय इंडिया 308 86 06 02 02
सीएनएक्स 272 108 10 02 01
सी व्होटर 236 140 17 06 02