प्रतिनिधी / बेंगळूर
काँग्रेस पक्षसंघटना करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ‘जनध्वनी’ रॅली काढण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी 3 मार्चपासून राज्य काँग्रेसतर्फे जनध्वनी रॅली सुरू होणार आहे. सोमवारी डी. के. शिवकुमार यांनी कोलार जिल्हय़ातील ऐतिहासिक रकुरुडमलेय विनायक मंदिरात दर्शन घेऊन रॅली निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना केली.
मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, म्हैसूर महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात निजद आमदार सा. रा. महेश यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची बाब खरी आहे. आपल्याला निजद नेत्यांनी यापूर्वी आश्वासन दिले होते. यंदा देखील निजद-काँग्रेस युती कायम ठेवण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे महापौर निवडणुकीत त्यांनी शब्द पाळून आपल्या पक्षाला महापौरपद सोडून देणे आवश्यक होते. मात्र, निजद नेत्यांनी आमदार तन्वीर सेठ यांच्याशी चर्चा करणार सांगितले होते, असे ते म्हणाले.