वृत्तसंस्था/ मुंबई
19 वर्षाखालील वयोगटाची विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया भारतीय युवा संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवा विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार प्रदर्शन केले होते. पण नंतर वरिष्ठ स्तरावर त्याला त्याची पुनरावृत्ती करता आली नाही.
28 वर्षीय उन्मुक्त चंदने सोशल मीडियामधून अनेक ट्विट करीत व सोबत काही संस्मरणीय व्हिडीओ जोडत त्याने हा निर्णय जाहीर केला. अमेरिकेत होणाऱया टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. विश्वचषक जिंकणाऱया त्याच्या संघातील एक सदस्य स्मित पटेलनेही असाच निर्णय घेतला होता. तो सध्या अमेरिकन लीगमध्ये खेळत आहे. विदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडून परवानगी दिली जात नाही. निवृत्तीनंतर मात्र खेळाडू या लीगमध्ये खेळू शकतात. या कारणामुळेच चंदने निवृत्ती घोषित केली आहे. चंदने 2012 मधील यू-19 विश्वचषक स्पर्धा आपल्या नेतृत्वाखाली जिंकून दिल्यानंतर त्याची लोकप्रियताही वाढली होती आणि ऑस्ट्रेलियाच्या इयान चॅपेल यांनीही त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी अंतिम लढतीत त्याने नाबाद 111 धावांची विजयी खेळी केली होती. त्याने एकूण 67 प्रथमश्रेणी सामन्यांत 3379 धावा जमविल्या. त्यात 8 शतके व 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने दिल्ली व नंतर उत्तराखंडचे प्रतिनिधित्व केले होते.