सातारा / प्रतिनिधी :
वाढे ता. सातारा गावच्या हद्दीत हॉटेल शिवशाहीच्या पुढे अज्ञात इसमाने वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसह उभा केला होता. या ट्रॉलीला धडकून भरत लक्ष्मण सावंत (वय 50, रा. लिंब) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत लक्ष्मण सावंत हे दि. 18 रोजी 7 वाजण्याच्या सुमारास वाढे गावच्या हद्दीतून मोटार सायकल (एमएच 11 सीडी 7060) ने सातारा ते लोणंद मार्गे निघाले हेते. यावेळी हॉटेल शिवशाहीच्या पुढे अज्ञात इसमाने न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच 45 एफ 2698) हा उसाने भरलेल्या ट्रॉलीसह कॉनॉलच्या रस्त्यालगत वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केला होता. या ट्रॉलीच्या पाठीमागील बाजुला लक्ष्मण सावंत यांच्या मोटार सायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सावंत यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.