प्रथम पसंतीच्या मतातच सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी
सतीश चव्हाण यांनी साधली विजयाची हॅट्ट्रिक
प्रतिनिधी / उस्मानाबाद
05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना एक लाख 16 हजार 638 मते पडली. यामुळे ते सलग तीनदा निवडून आल्यामुळे त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते पडली. त्याचबरोबर ढवळे सचिन 11702, नागोराव पांचाळ 8993, सिद्धेश्वर मुंडे 8053, रमेश पोकळे, 6717 यांना इतकी मते पडली आहेत.
विजयी उमेदवारासाठी 1 लाख 9 हजार 409 मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत एकूण दोन लाख 41 हजार 908 मतदार बांधवांनी मतदान केले होते. त्यापैकी 23092 मध्ये बाद झाली. पहिल्याच पसंतीच्या मतावर आमदार सतीश चव्हाण यांनी निवडून येण्याचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
त्यांना मिळालेले मताधिक्य हे 57 हजार 895 आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील हा विजय रेकॉर्डब्रेक विजय आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयाचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते देण्यात आले. सतीश चव्हाण निवडून आल्यानंतर उस्मानाबादमध्ये त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यांच्या समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतिषबाजी त्यांचा विजयोत्सव साजरा केला.