वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी टूरवर प्रथमच एकत्र खेळणारे भारताचे रोहन बोपण्णा व रामकुमार रामनाथन यांनी येथे झालेल्या ऍडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी अग्रमानांकित इव्हान डोडिग व मार्सेलो मेलो यांना पराभवाचा धक्का दिला.
बोपण्णा-रामकुमार यांनी ही संघर्षपूर्ण लढत 7-6 (8-6), 6-1 अशी जिंकली. बोपण्णाचे महत्त्वाच्या वेळचे उत्कृष्ट परतीचे फटके व रामकुमारचा अष्टपैलू खेळ याच्या बळावर भारतीय जोडीने हे यश मिळविले. सुमारे दीड तास चाललेल्या या लढतीत भारतीय जोडीने चारही ब्रेक पॉईंट्स वाचवले. बोपण्णाचे हे 20 वे तर रामकुमारचे हे पहिलेच एटीपी जेतेपद आहे. रामकुमारची अंतिम फेरीत खेळण्याची ही एकूण दुसरी वेळ होती. याआधी त्याने 2018 मधील हॉल ऑफ फेम चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी त्याला उपविजेतेपद मिळाले होते. दोघांना 18700 डॉलर्स बक्षीस व 250 मानांकन गुण मिळाले.