विविध टप्प्यावर योजना आखण्याचे संकेत : रॉयर्ट्सकडून माहिती सादर
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
आयफोनच्या निर्मितीत अग्रेसर कंपनी ऍपल आता कारच्या उत्पादनात लक्ष घालणार असल्याचे सांगितले जाते. ऍपल इंक सेल्फ ड्रायव्हींग (स्वयंचलीत) तंत्रज्ञानासोबत कार निर्मितीवर भर देणार आहे. याअंतर्गत ऍपल कंपनीने 2024 पर्यंत आपले वाहन बाजारात उतरवण्याचे ध्येय ठरवले आहे. कंपनी स्वनिर्मित बॅटरीसह अन्य तंत्रज्ञानाच्या वापरासह वाहन बाजारात आणणार असल्याचे सांगण्यात येते.
टायटन प्रकल्पांतर्गत ऑटोमोटीव्ह क्षेत्रात योगदान देण्यासाठी कंपनी भविष्यकाळात प्रयत्न करणार आहे. 2014 पासून या क्षेत्रात खरेतर कंपनी आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. पण कंपनीला म्हणावी तशी प्रगती त्यात घेता आलेली नाही. पण आता मात्र कंपनी प्रवासी कार निर्मितीबाबत गंभीर असल्याचे समजते. पण सार्वजनिक स्तरावर कारच्या निर्मितीबाबत कंपनीकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत कंपनी गुपीत पाळून आहे. बाजारातील स्पर्धेत उतरून स्वत:च्या कार्स बाजारात दाखल करण्याचा ऍपलचा विचार आहे. कार बॅटरीच्या निर्मितीत नवतंत्रज्ञान ऍपल वापरणार आहे. भविष्यकालीन उत्पादनांबाबतीत मात्र ऍपलने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
ऍपलची भक्कम क्षमतेची बॅटरी
ऍपलकडून नवीन बॅटरीचे डिझाइन करण्यात आले आहे. यात बॅटरी कमीत कमी वेळेत चार्ज होऊन अधिक काळ क्षमता टिकविणारी राहणार असल्याचे संकेत आहेत. महामारीच्या कारणामुळे उत्पादनासाठी 2025 पेक्षाही अधिकचा कालावधी लागण्याचे संकेत आहेत.