हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे एक अनोखी ‘सायन्स सिटी’ साकारली जात आहे. 50 एकर भूमीवर तिचे निर्माण कार्य होत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नाने या स्थानी लहान मुलांना हसत खेळत विज्ञानाचे धडे घेता येणार आहेत. या सायन्स सिटीमध्ये इस्त्रो या भारताच्या अवकाश संशोधन केंद्राची स्पेस गॅलरीही निर्माण केली जात आहे. हरियाणातील अंबाला येथे एक सायन्स सिटी अस्तित्वात आहे. त्याहीपेक्षा ही नवी सायन्स सिटी अधिक वैशिष्टय़पूर्ण असेल असे प्रतिपादन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
मुलांमध्ये बालपणापासूनच विज्ञानाचे सिद्धांत रुजवले जावेत, यासाठी येथे प्रयत्न होणार आहेत. त्याचप्रमाणे लहानपणापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच मोठेपणी तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक संशोधक बनण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या सायन्स सिटीची रचना करण्यात आली आहे. जटील वैज्ञानिक सिद्धांत सोप्या भाषेत आणि सोप्या प्रयोगाच्या माध्यमातून समजून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आस्था निर्माण होईल आणि हे विषय त्यांना अवघड वाटणार नाहीत, अशी योजना आहे. या सायन्स सिटीचा लाभ देशातील तांत्रिक विद्यापीठांना आणि उद्योग व्यवसायांनाही होणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटीक्स, बायॉलॉजी हे चार मूलभूत वैज्ञानिक विषय येथे विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. इस्त्रो यासाठी विशेष स्पेस गॅलरी निर्माण करण्यास प्रारंभ केले आहे. एकंदर विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींसाठी हे विज्ञान नगर एक वरदान ठरणार आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.