क्रीडा /प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एजे स्पोर्ट्सने एक्सेस इलाईट संघाचा 44 धावांनी तर गोकाक ग्लॅडिएटर्सने सीसीआय ब्ल्यू संघाचा सहा गडय़ांनी पराभव केला. केशव मुक्कण्णावर (एजे स्पोर्ट्स), शाहबाज जमखंडी (गोकाक) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एजे स्पोर्ट्सने 23 षटकांत 8 बाद 120 धावा केल्या. त्यात केशव मुक्कण्णावरने 24, कुशल कित्तूरने 19, जीत गदियाने 16, आदि नलवडेने 14 धावा केल्या. एक्सेस इलाईटतर्फे साहिल सुर्यवंशीने 15 धावांत 3 तर वृषभ पाटीलने 26 धावांत 2, वेदांग बाडकरने 28 धावांत 2 तर साईनाथ राजोळीने एक गडी बाद केला. त्यानंतर एक्सेस इलाईटचा डाव 18.3 षटकांत 77 धावांत समाप्त झाला. त्यात मणिकांत भुकीटगारने 18 धावा तर अक्षय कुलकर्णीनें 17, सात्विक सावंतने 12, तनुष धुमाळेने 10 धावा केल्या. एजे स्पोर्स्ट्सतर्फे लक्ष वेर्णेकरने 18 धावांत 3, आदित्य खिलारेने 5 धावांत 2, विनायक पांडेने 17 धावांत 2 तर केशव मुक्कण्णावरने 22 धावांत 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात सीसीआय ब्ल्यू संघाने 23.2 षटकांत सर्व बाद 77 धावा केली. त्यात हर्ष पटेलने नाबाद 22 तर मयुरेश मंडलीकने 16 धावा केल्या. गोकाकतर्फे हर्ष पाटीलने 11 धावांत 3, शाहबाज जमखंडीने 18 धावांत 2, ओवेस निंबुवालेने 19 धावांत 2 तर नुमान व सिद्धेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गोकाक ग्लॅडिएटर्सने 15.3 षटकांत 4 बाद 80 धावा करून सामना सहा गडय़ांनी जिंकला. अनमोल पागदने 19, शाहबाज जमखंडीने 18 तर सिद्धेश असलकरने 16 धावा केल्या. सीसीआयतर्फे भुवन बसडोणीने 2 गडी तर हर्ष पटेलने एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रताप नलवडे, सुधीर गड्डे, अस्लम बिजापूर, विक्रम देसाई यांच्याहस्ते केशव मुक्कण्णावरला तर गिरीश सोनवलकर, व्ही. लोकेश, मनोहर बेळगावकर, नागेश देसाई यांच्या हस्ते शाहबाज जमखंडीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
रविवारचे सामने : 1) एजे स्पोर्ट्स वि. देसाई वॉरियर्स, सकाळी 9.20 वाजता. 2) गोकाक ग्लॅडिएटर्स वि. आनंद अकादमी, दुपारी 1.30 वाजता.