सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील जुन्या एमआयडीसीत के. एन्टरप्रायजेसजवळ एका व्यावसयिकास अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी केले. मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल नंदलाल कटारिया (वय,50, रा. जयजवान हौसिंग सोसायटी सदरबाजार) हे त्यांच्या मोटारीतून मंगळवारी (दि.9) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चालले होते. त्यावेळी एक दुचाकी चालक येवून त्यांच्या गाडीला धडकून खाली पडला. त्याला रूग्णालयात नेण्याचा विचार कटारिया करत असताना एक अनोळखी व्यक्ती तेथे आला अन् त्याने हातातील लोखंडी रॉडने मारहाण करुन कटारिया यांना जखमी केले. अधिक तपास हवालदार भोसले करीत आहेत.