ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 1,000 रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्यासाठी 1000 खाटांचे रुग्णालय निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे नजीकच्या धारावी परिसरासाठी मोठी सुविधा होणार आहे. आणि अजून गरज भासल्यास 5 हजार खाटांची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
ते म्हणाले, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयामधल्या खाटांची संख्या सध्या 1,000 आहे. यापैकी 500 बेडवर ऑक्सिजनची सोय असेल.
तसेच इथे असलेल्या रुग्णांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबची सोय असेल. यात सर्वसाधारण रक्त तपासणी करता येईल.
आरोग्य सेवा देणाऱ्या इतर संस्थांच्या धर्तीवर या रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचबरोबर इथे डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असतील व त्यांच्या निवार्याची सोय सुद्धा असेल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.