मुंबई : लार्सन अँड टुब्रो कंपनीचा एप्रिल ते जून कालावधीतला तिमाहीतला करापूर्वीचा नफा घटला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घट वर्षागणिक पाहता 66 टक्के इतकी लक्षणीय असल्याचे समजते. कंपनीला तिमाहीत 894 कोटी रुपयांचा करापूर्वी नफा झाला आहे. जो आर्थिक वर्ष 2020 मध्ये याच कालावधीत 2 हजार 655 कोटी रुपयांचा होता. निव्वळ नफा 303 कोटी रुपयांवर घसरला आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान कालावधीमध्ये नफा 1 हजार 472 कोटी रुपये होता. म्हणजेच निव्वळ नफा 79 टक्क्यांनी घटला आहे. कंपनीचा यावर्षीच्या तिमाहीत महसूल 21 हजार 259 कोटी रुपयांवर पोहचला आहे जो मागच्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के कमी आहे.
महिंद्रा मोजो मोटारसायकलचे बुकिंग सुरू
नवी दिल्ली : देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी महिंद्राच्या बीएस- 6 शेणीतील नव्या मोजो या मोटारसायकलीचे बुकिंग सुरू झाले आहे. लवकरच ही नवी बाईक बाजारात उपलब्ध होणार आहे. या गाडीचे बुकिंग करायचे असल्यास इच्छुक ग्राहकांना 5 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. रबी रेड, ब्लॅक पर्ल, गारनेट ब्लॅक व रेड अगाटे या चार रंगात ही गाडी उपलब्ध होणार आहे. या गाडीची किमत 1 लाख 90 हजार रुपये असणार आहे.
निकॉनचा नवा झेड 5 कॅमेरा लाँच
नवी दिल्ली : जपानची कंपनी निकॉनने फुलप्रेम मिररलेस कॅमेरा निकॉन झेड 5 भारतीय बाजारात लाँच केला आहे. या कॅमेऱयाची किंमत 1 लाख 13 हजार 995 रुपये असणार असून 675 ग्रॅम वजनाचा हा तसा हलका कॅमेरा प्रत्यक्षात 27 ऑगस्टपासून विक्रीकरीता उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्रे घेण्याची या कॅमेऱयात क्षमता तर आहेच पण इतरही वैशिष्टय़े यात आहेत. ग्राहकांना हा कॅमेरा नक्कीच पसंत पडेल असा विश्वास कंपनीला आहे. निकॉन स्नॅप ब्रिजच्या माध्यमातून एखाद्याला फोटो सोशल मीडियावर टाकण्याची सोय या कॅमेऱयात आहे.