मडगाव पालिकेकडून नोटिसा, पोलीस फौजफाटा घेऊन गेल्यानंतर बहुतेकांनी शुल्क फेडले
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने सोमवारी सकाळी एसजीपीडीए मैदानावर पालिकेची परवानगी न घेता स्टॉल उभारलेल्या सुतारांना व अन्य स्टॉलधारकांना नोटिसा बजावल्या. दुपारपर्यंत पालिकेला पैसे न फेडल्यास कारवाई करण्याचा इशारा सकाळी या बेकायदा स्टॉलधारकांना देण्यात आला. दुपारी पालिका पोलीस फौजफाटा घेऊन गेली असता बहुतेकांनी नंतर पालिकेचे शुल्क फेडल्याची माहिती मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस यांनी दिली.
एसजीपीडीए मैदानाची दीड हजार चौरस मीटर जमीन जायंट व्हील तसेच अन्य प्रदर्शनासाठी वापरली जाईल असे प्राधिकरणाकडून कळविण्यात आले होते व सदर जायंट व्हील उभारण्यासाठी व प्रदर्शन भरविण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीकडून पालिकेला 5.10 लाख रु. शुल्क भरण्यात आले होते. असे असले, तरी उर्वरित सुमारे 7 ते 8 हजार चौरस मीटर जमिनीत पालिकेची परवानगी न घेता वा शुल्क न फेडता कित्येक बेकायदा स्टॉल उभारण्यात आले होते. आपण एसजीपीडीएला शुल्क फेडले असल्याचे हे स्टॉलचालक सांगत होते.
मात्र पालिकेची परवानगी घेण्यात न आल्याने पालिकेने सोमवारी सकाळी प्रत्येक स्टॉलला 2 बाय 2 जागेनुसार 4700 रु. भरण्यास सांगितले. दुपारपर्यंत सदर रक्कम भरली जात नसल्याने पालिकेने कारवाईची तयारी केली. नंतर पालिकेत मुख्याधिकारी रोहित कदम तसेच नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांची भेट घेतल्यानंतर या स्टॉलधारकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली. अन्य स्टॉलधारकांनी सुमारे 4 लाख रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली.
सुतारांनी एरव्ही 30 हजारांचा भरणा केला जातो, पण यावेळी एक लाख रुपया भरण्याची तयारी दर्शविली असता यासंदर्भात पालिका मंडळ निर्णय घेऊ शकते, असे मुख्याधिकारी कदम यांनी स्पष्ट केले. आपण ही बाब मंडळासमोर ठेवणार आहे. मंडळ काय तो बैठकीत निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. अन्य स्टॉलधारकांनी यापूर्वी 4 लाख भरलेले आहेत. त्यांनी त्याशिवाय आणखी 4 लाख भरले असले, तरी आणखी चार लाख आज मंगळवारी भरण्यास फर्मावले गेले आहे. ही रोख रक्कम आज भरली जाईल. त्यासाठी 4 लाखांचा धनादेश हमी म्हणून घेतला आहे. रोख भरल्यानंतर हा धनादेश परत केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.