लोकशाहीची शान राखून सर्वांना न्याय देणार : काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा यांचा केला पराभव
प्रतिनिधी /पणजी
नव्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल मंगळवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे काणकोणचे आमदार रमेश तवडकर हे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाचे नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा 24 विरुद्ध 15 मतांनी पराभव केला. सभापती या उच्च पदावर आरुढ होणारे तवडकर हे पहिले आदिवासी अर्थात एसटी समाजातील नेते व आमदार आहेत.
हंगामी सभापती गणेश गांवकर यांनी रमेश तवडकर यांची निवड जाहीर करताच सभागृहातील सर्व पक्षीय आमदारांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तवडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि नंतर त्यावर चर्चा करुन सर्व आमदारांनी त्यास पाठिंबा दिला आणि सर्वसंमतीने त्यास मान्यता देण्यात आली.
राष्ट्रगीताने अधिवेशनाची सुरुवात झाली. हंगामी सभापती गणेश गावकर यांनी सभापती निवडीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आणि त्या पदासाठी भाजपतर्फे रमेश तवडकर व काँग्रेसतर्फे आलेक्स सिक्वेरा यांची नावे आल्याची माहिती दिली. गांवकर यांनी भाजपचे उमेदवार तवडकर यांचा प्रस्ताव निवडणुकीसाठी मांडला व त्या प्रस्तावास पाठिंबा देणाऱयांनी उभे राहाण्याची सूचना केली. त्यानुसार भाजपचे सर्व आमदार तसेच मगोपचे दोन आणि तीन अपक्ष अशा एकूण 24 आमदारांनी उभे राहून पाठिंबा दिला अर्थात तवडकर यांना 24 मते मिळाली तर सिक्वेरा यांचा प्रस्ताव मांडताच काँग्रेस – आप, गोवा फॉरवर्ड व आरजी अशा एकूण 15 आमदारांनी सिक्वेरांना पाठिंबा दर्शविला अर्थात त्यांना 15 मते मिळाली. एकूण 9 मतांनी तवडकर निवडून आले. त्यानंतर डॉ. सावंत तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी त्यांना सन्मानाने नेऊन सभापतीपदाच्या खुर्चीवर बसवले आणि त्यांचे अभिनंदन केले.
सभापतीपदाची निवडणूक होताच डॉ. सावंत यांनी तवडकर यांचा अभिनंदन ठराव मांडला. त्यावर बहुतेक सर्वपक्षीय आमदारांनी भाषणे करुन तवडकर यांचे कौतुक केले आणि त्यांना सभापतीच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी कोणताही भेदभाव न करता सत्ताधारी, विरोधी पक्षांना समान न्याय द्यावा, अशी मागणी आमदारांनी केली.
लोकशाहीची शान राखणार : तवडकर
सभापतीपद म्हणजे आपले मतदार, कार्यकर्ते, समाज यांचा मोठा सन्मान असून आपण लोकशाहीची शान राखून सर्वांना योग्य तो न्याय देणार आणि कोणावरही अन्याय करणार नाही, असे आश्वासन तवडकर यांनी दिले.
तवडकर यांच्या अभिनंदन ठरावावर मगो आमदार सुदिन ढवळीकर, उल्हास तुयेकर, मायकल लोबो, विश्वजित राणे, आलेक्स रेजिनाल्ड, माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, रुडॉल्फ फर्नांडिस, चंद्रकांत शेटये, नीलेश काब्राल, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, कार्लुस परेरा, व्हॅन्सी व्हिएगश, आलेक्स सिक्वेरा अशा सर्व पक्षीय आमदारांनी भाषणे केली आणि तवडकरांच्या निवडीबाबत आनंद प्रकट केला.
शेवटी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तवडकर हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत, अशी ग्वाही दिली आणि विंदा करंदीकरांची काव्यपंक्ती वाचत तवडकरांचे अभिनंदन केले.
विजय सरदेसाई यांची आक्षेपार्ह टिपणी
सभापती रमेश तवडकर यांच्या अभिनंदन ठरावावरील चर्चेच्या वेळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभापती असणारी व्यक्ती पुन्हा निवडून येत नाही अशी टिपणी विधानसभा अधिवेशनात केल्यानंतर मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यास आक्षेप घेतला आणि ते शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्यावरुन दोन्ही आमदारात खडाजंगी झाली. दरम्यान सभापती तवडकर यांनी त्यातील काही शब्द कामकाजातून काढून टाकले आणि निर्माण झालेला वाद संपुष्टात आणला.
सरदेसाई म्हणाले की, अलिकडच्या काळातील सभापतींच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा होते. लोकशाहीची हत्या होते असेही आरोप होतात. त्या पदावरील व्यक्ती परत निवडून येत नाही याचा अर्थ ती लोकप्रिय होत नाही, असे नव्हे!
त्यावर माविन गुदिन्हो यांनी मध्येच उभे राहून सरदेसाई यांना रोखले आणि त्यांचे म्हणणे आक्षेपार्ह असल्याचे नमूद केले. त्यामुळे सदर व्यक्ती विनाकारण नाउमेद होते. म्हणून ते शब्द काढून टाका असे गुदिन्हो यांनी सभापतींना सूचवले. ते काढण्याची गरज नाही असे सरदेसाई म्हणाले परंतु शेवटी वाद मिटवण्यासाठी सभापतींनी काही शब्द काढून टाकले.