मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची मंत्री, अधिकाऱयांना सूचना : कोरोनाबाधितांच्या उपचारामध्ये कशाचीही कमतरता नको
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्री आणि अधिकाऱयांना दिली आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे आवश्यकतेनुसारच वितरण करण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजता बेंगळूरमधील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांशी कोविड नियंत्रणासंबंधी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी जबाबदारी सोपविलेल्या मंत्र्यांना रुग्णांच्या उपचारामध्ये कशाचीही कमतरता भासू नये, यासाठी सतर्क राहण्याची सूचना केली. प्रामुख्याने लॉकडाऊन जारी करून कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अनावश्यक फिरण्यास प्रतिबंध घाला, अशी सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱयांना दिली.
अत्यावश्यक असणाऱया कोरोना रुग्णांसाठी त्वरित बेड उपलब्ध व्हावेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण गरजेनुसारच करावे. खासगी इस्पितळांकडून रुग्णांना देण्यात येणाऱया बेडच्या बाबतीतही लक्ष द्यावे. शिवाय ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड यासह इतर बाबतीत गैरव्यवहार किंवा काळाबाजार होत असेल तर कायदेशीर कारवाई करा, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱयांना दिला.
ऑक्सिजन प्लांट निर्माण होणार
कोविड वॉर रुममधील कामकाज आणखी परिणामकारी करा. टप्प्याटप्प्याने सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व इस्पितळांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट सुरू करण्यासाठी आतापासूनच काम सुरू करा. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. याकरिता एक टास्क फोर्स कमिटी नेमण्याची सूचना देण्यात आली. आमदार आणि मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये वास्तव्य करून तेथील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.