वृत्तसंस्था/ लंडन
कोरोनामुळे जगातील सर्वच व्यवहार ठप्प पडले असून क्रीडा जगतालाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बुद्धिबळ जगत मात्र याला अपवाद ठरले असून दि. 5 ते 10 मे दरम्यान ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ व चेस डॉट कॉम या संकेतस्थळाने घोषणा केली आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद व युरोपियन संघाचे नेतृत्व गॅरी कॅस्पारोव्ह संघाकडे सोपवण्यात आले आहे. यात भारतासह रशिया, अमेरिका, युरोप, चीन आणि शेष विश्व असे सहा संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक संघात तीन पुरुष व एका महिला खेळाडूचा समावेश असणार आहे. या सर्व लढती रॅपिड पद्धतीने होणार असून स्पर्धेसाठी 1 लाख 80 हजार डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. जगभरातील सर्वच आघाडीचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये दि. 5 ते 9 मे दरम्यान साखळी लढतींच्या दोन फेऱया होणार आहेत. यानंतर, पहिल्या दोन स्थानी राहणारे संघ 10 मे रोजी विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारा फिडेचे आंतरराष्ट्रीय पंच खेळाडूंवर नजर ठेवणार आहेत. खेळाडूंचे वेबकॅम, कॉम्प्युटर क्रीन आणि ते बसणार असलेल्या खोलीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येणार आहे. स्पर्धेचे यू टय़ुब, ट्विटर, फेसबुक लाईव्ह यासह ऑनलाईनची विविध माध्यमे आणि अधिकृत संकेतस्थळांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे