धावडशी येथील युवकाची फसवणूक
प्रतिनिधी/ सातारा
धावडशी (ता. सातारा) येथील युवकाने ऑनलाईन मोबाईल मागितला होता, प्रत्यक्षात मात्र फायबरच्या देवीच्या मूर्ती मिळाल्याने डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यामध्ये विवेक सुरेश पवार (वय 18, रा. धावडशी, ता. सातारा) याची 4 हजार 500 रुपयांची फसवणूक झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, विवेक पवार या युवकाला चार दिवसापूर्वी डॉटकॉम टेलीशॉपिंग शोप नंबर 2, ग्राऊंड फ्लोअर, काटकाडोमा, दिल्ली येथून त्याच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने फोन करून साडेबारा हजार रुपयांचा मोबाईल केवळ साडेचार हजार रुपयांमध्ये ऑफरमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार विवेक पवार याने ऑनलाईन मोबाईलचे बुकींग केले. दोन दिवसांत स्पीड पोस्टद्वारे पोस्टमन विवेक पवार यांच्या घरी एक पार्सल घेऊन आला. पवार याने संबंधित पोस्टमनला साडेचार हजार रुपये देऊन ते पार्सल फोडले असता, मोबाईल ऐवजी त्यामध्ये फायबरच्या देवीच्या तीन मूर्ती असल्याचे निदर्शनास आले. त्याने ही बाब पोस्टमनला सांगितली. मात्र, पोस्टमनने पार्सल देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, आतमध्ये काय आहे हे पाहण्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगितले. विवेक पवार याने संबंधित मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याचे सांगितल्याने त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.::