डिसेंबरमध्ये प्रतिष्ठेच्या मालिकेला प्रारंभ, महिला संघात तिहेरी मालिकेचे आयोजन
सिडनी / वृत्तसंस्था
या वर्षअखेरीस इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिका खेळवली जाईल, त्यावेळी प्रेक्षकांची उत्स्फूर्त हजेरी स्टेडियमवर असेल, अशी आमची आशा आहे. मात्र, त्यावेळी जी परिस्थिती असेल, त्यानुसार व केंद्रीय प्रशासनाचा सल्ला घेऊनच अंतिम स्वरुप निश्चित केले जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी नमूद केले. परंपरेप्रमाणे डिसेंबरमध्ये सुरु होणाऱया ऍशेस मालिकेची प्राथमिक रुपरेषा यावेळी जाहीर केली गेली.
दि. 8 डिसेंबर रोजी गब्बा येथील पहिल्या कसोटी सामन्याने या प्रतिष्ठेच्या मालिकेचे बिगूल वाजणार आहे. त्यानंतर ऍडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळवली जाईल. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पारंपरिक बॉक्ंिसग डे कसोटी होणार आहे. सिडनीत चौथी तर पर्थमध्ये पाचवी कसोटी लढत होईल. या शेवटच्या दोन लढती जानेवारीत होणार आहेत.
यापूर्वी, भारताविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या ऐतिहासिक मालिकेत ऑस्ट्रेलियाला मायभूमीत 1-2 अशा फरकाने धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. कोरोनाच्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर, त्यावेळी मर्यादित संख्येने पेक्षकांना प्रवेश दिला गेला होता. आताही कोरोनामुळेच ऑस्ट्रेलियामधून इंग्लंडला अति आवश्यक कारण वगळता प्रवासाला परवानगी नाही.
महिला संघातही मालिका
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातही यावेळी स्वतंत्र मालिका आयोजित केली गेली आहे. त्यानुसार उभय संघ 1 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील एकमेव कसोटी 27 ते 30 जानेवारी या कालावधीत कॅनबेरा येथे होईल. त्यानंतर 3 टी-20 व 3 वनडे लढती सिडनी ओव्हल, ऍडलेड ओव्हल व जंक्शन ओव्हल, मेलबर्न येथे खेळवल्या जाणार आहेत.
‘2020-21 च्या सुरक्षित हंगामाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच मालिका आयोजित करुन त्या यशस्वीपणे संपन्न करु शकतो, हा आत्मविश्वास देखील पाठीशी आहे. ऍशेसबद्दल जी प्रचंड उत्सुकता असते, ती यंदाच्या मालिकेतही दिसून येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. इंग्लिश चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत’.
-क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली
ऍशेसची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
8 ते 12 डिसेंबर / पहिली कसोटी / गब्बा, ब्रिस्बेन
16 ते 20 डिसेंबर / दुसरी कसोटी / ऍडलेड ओव्हल, ऍडलेड
26 ते 30 डिसेंबर / तिसरी कसोटी / एमसीजी, मेलबर्न
5 ते 9 जानेवारी / चौथी कसोटी / एससीजी, सिडनी
14 ते 18 जानेवारी / पाचवी कसोटी / ऑप्टस स्टेडियम, पर्थ